शेतातून घरी येताना काळ कोसळला! अज्ञात वाहनाने धडक दिली; तरुणाचा जागीच मृत्यू...! भरोसा ते देऊळगाव घुबे रोडवरील घटना
Dec 19, 2024, 09:03 IST
चिखली(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अज्ञात वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरोसा देऊळगाव घुबे रोडवर ही घटना घडली. पवन सुनील ठाकूर(३६, रा.मेरा खुर्द, ता.चिखली) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे..
प्राप्त माहितीनुसार पवन ठाकूर यांच्या पत्नी जाफ्राराबाद येथील नगरपालिकेत नोकरी करतात, त्यामुळे नोकरी निमित्त ते जाफ्राराबाद राहतात. त्यांची शेती मेरा खुर्द येथे असल्याने शेती कामासाठी ते मेरा खुर्द येथे जे जा करतात. १७ डिसेंबर रोजी शेतातील सर्व कामे आटोपून पवन ठाकूर मेरा खुर्द वरून जाफ्राराबाद कडे निघाले होते. दरम्यान त्यांना कुण्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली. जखमी अवस्थेत पवन ठाकूर बराच वेळ रस्त्यावर पडून होते. तिथे बऱ्याच जणांची गर्दी झाली मात्र मदतीसाठी कुणीच समोर आले नाही.त्याचवेळी मेरा खुर्द येथील बाळू वराडे हे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या वाहनाने जात होते. गर्दी दिसल्याने त्यांनी वाहन थांबवले, अपघातग्रस्त तरुण पाहून त्यांना ओळख पटली. त्यांनी लगेच व्यवस्था करून जखमी तरुणाला चिखली येथील रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी पवन ठाकूर यांना मृत घोषित केले. वृत्त तरुण पवन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पवन यांना देखील दोन मुले आहेत. अजानत्या वयात वडिलांचे छत्र हरविल्याने गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत...