खामगावात तीन दिवशीय नामजप शिबिराचे आयोजन ! समर्थ सदगुरू श्रीहरी महाराजांची राहणार उपस्थिती

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रामनामाचा प्रसार आणि प्रचारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरु श्री. श्रीहरी महाराज ( श्रीक्षेत्र माकोडी ) यांच्या कृपाशीर्वादाने खामगावकर भाविकांनी तीन दिवसीय "श्रीराम जयराम जय जय राम" त्रयोदशाक्षरी तारकमंत्राच्या नामजप शिबिराचे आयोजन केले आहे. 
अग्रेसन भवन बालाजी प्लॉट खामगाव येथे २६, २७ व २८ मे २०२६ या तीन दिवस नामजप शिबिराच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडणार आहेत.  
"नामस्मरण निरंतर ..ते जाणावे पुण्यशरीर... महादोषांचे गिरीवर रामनामे नासति.. श्रीराम .."
संतांनी मानवाला शाश्वत समाधान मिळण्यासाठी नामस्मरण व सद्गुरुभक्ती हे साधन सांगितले आहे. यासाठी मानवाने या साधनेची कास धरून आपल्याला मिळालेल्या दुर्लभ अशा नरदेहाचे सार्थक केले पाहिजे. यासाठी समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने खामगावकर भाविकांनी नामजप शिबिर आयोजित केले आहे. नामजप शिबिराची सुरुवात व सांगता समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज यांच्या अमृतवाणीतून होणार आहे. मंगळवार २६ मे रोजी सकाळी ५ वाजता काकड आरतीने या सोहळ्याला सुरुवात होईल. ७ वाजता अखंड नामजप प्रारंभ होईल. ११.४५ वाजता रामपाठ त्यानंतर नैवेद्य आरती सायंकाळी ६ वाजता उपासना आणि रात्री ८ वाजता ह. भ. प.कैलास महाराज, (धर्माळी) यांचे कीर्तन होणार आहे. बुधवारी २७ मे रोजी पहाटे काकड आरती पासून पुन्हा विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होतील. सायंकाळी ६ वाजता उपासना झाल्यानंतर ८ आठ वाजता ह भ प किसन महाराज सुपेकर हे आपली कीर्तन सेवा देणार आहेत.२८ मे रोजी सकाळी दहा वाजता हभप ज्ञानेश्वर माऊली निरपूरकर यांचे काल्याचे किर्तन होईल दुपारी नैवेद्य आरती नंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. नामधारक साधकांची निवास व भोजनाची व्यवस्था कार्यक्रम स्थळीच करण्यात आलेली आहे. शिबिराचा भाविकांनी लाभ घेऊन आपली सेवा रुजू करावी असे आवाहन श्रीराम उपासना मंडळ खामगाव यांनी केले आहे.