लोणार नगरपालिकेत स्वच्छतेचे तीन तेरा! लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण! कार्यालयातही घाणीचे साम्राज्य; पाण्याअभावी स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था....

 
 लोणार (प्रेम सिंगी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून प्रसिद्ध असलेले लोणार शहर सध्या साफसफाईच्या बाबतीत संपूर्णपणे हतबल झाले आहे. शहरातील गटारे, रस्ते, कचरा व्यवस्थापनासोबतच नगरपालिका कार्यालयाच्या देखील अत्यंत दयनीय परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे लोकांना स्वच्छतेचे डोस पाजणाऱ्या नगरपालिकेची अवस्था ही लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी झाली आहे.
 
लोणार नगरपालिकेच्या हद्दीत अस्वच्छता दिवसेंदिवस वाढत असून, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिग, वाढलेले गवत, गटारांतील साचलेले पाणी यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. इतकेच नव्हे तर, खुद्द नगरपालिकेच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व नागरिक वापरत असलेली स्वच्छतागृहे सुद्धा पाण्याअभावी निकामी झाली आहेत. 'हगणदारी मुक्त शहर', 'स्वच्छ शहर, सुंदर शहर' असे नारे फक्त बोर्डांवरच उरले आहेत.
नागरिकांचा त्रास कायद्यात मांडणार का?
नगरपालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना व कर्मचाऱ्यांना मूळ गरजा पूर्ण न होण्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वच्छतागृहात पाणी नसणे ही केवळ व्यवस्थापनातील हलगर्जीपणाची नव्हे, तर सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखी बाब ठरत आहे.
प्रशासनाचे उत्तर — ‘GR मंजूर झाल्यावर पाहू!’
"बुलडाणा लाइव्ह"ने या संपूर्ण मुद्द्यावर प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी उत्तर दिले की, "ही समस्या नवीन नाही. बऱ्याच वर्षांपासून हेच चित्र आहे. याबाबत नूतनीकरणासाठी प्रस्ताव मजूर आहे. शासन निर्णय (GR) मिळाल्यावर टेंडर प्रक्रिया सुरू करू."
विकासाच्या गप्पा… आणि जमिनीवर गटारातच साचलेली स्वप्ने!
नगरपालिका जी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची स्वप्ने दाखवते, तीच जर आपल्या कार्यालयात मुलभूत सुविधा देऊ शकत नसेल, तर शहराचा विकास केवळ कागदावरच राहणार, असा सवाल आता लोणारकर विचारू लागले आहेत.