मातृतीर्थ सिंदखेडराजात जिजाऊभक्तांचा जनसागर! राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा...
Jan 12, 2026, 16:15 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा ४२८ वा जन्मोत्सव सोमवारी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे अत्यंत भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या या पवित्र नगरीत सकाळपासूनच जिजाऊभक्त व शिवप्रेमींचा प्रचंड जनसागर दर्शनासाठी लोटला होता.
सकाळी ६ वाजता राजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानी वंशज राजे शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली. यानंतर केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची महापूजा करून अभिवादन केले.
यावेळी आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे आदी मान्यवरांनीही राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राजमाता जिजाऊ जन्मस्थळी पालकमंत्री व सहपालकमंत्री नतमस्तक
बालशिवबासह जिजाऊ पुतळा उभारणीच्या जागेची पाहणी
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री ना. मकरंद पाटील व सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनीही मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले.
या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा इंटरचेंज (फेज क्र. ७) येथे उभारण्यात येणाऱ्या बालशिवबासह राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिंदखेडराजा विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील – ना. प्रतापराव जाधव
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त देशभरातून जिजाऊभक्त व शिवप्रेमी मातृतीर्थ सिंदखेडराजात येतात, हे या भूमीचे वैभव आहे. या जन्मोत्सवामुळे जनमानसात मोठा उत्साह दिसून येत असून, जिजाऊंच्या दर्शनाने अनेकांना नवी प्रेरणा मिळते.”
ते पुढे म्हणाले की, “राज्य शासनाने सिंदखेडराजा विकास आराखडा जाहीर केला असून, त्यातील कामे विविध विभागांकडे सोपविण्यात आली आहेत. येथील अनेक ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे कामे अत्यंत बारकाईने होत असल्याने काही प्रमाणात विलंब होतो. मात्र दरवर्षी विकास आराखड्यातील नवी कामे पूर्ण होत असून, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून हा आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
