यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा काळ! एल निनो मुळे पावसाचा मोठा खंड पडण्याची ८० टक्के शक्यता! सोयाबीन, कापूस, तूर, मूग,उडीद पिकांच्या उत्पादनावर होणार परिणाम...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एका दाण्याचे चार दाणे करण्याची क्षमता असणाऱ्या आणि जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम कसोटीचा ठरणार आहे. एल निनो मुळे यंदा अत्यल्प पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. एल निनो मुळे पावसात मोठे खंड पडण्याची भीती विविध हवामान संस्थांनी वर्तवली आहे. जागतिक हवामान संघटनेने देखील जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनो चा प्रभाव ८० टक्के राहणार असल्याचा अंदाज दिला आहे.
प्रशांत महासागरातील विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढल्यास त्याला एल निनो म्हणतात. या तापमान वाढीमुळे जगभरातील वाऱ्यांचे आणि पावसांचे चक्र बदलते त्याचे सर्वाधिक परिणाम भारतातील नैऋत्य मान्सूनवर होतात. अनेकदा पावसाचे प्रमाण घटते पावसात मोठे खंड पडतात, पाऊस वेळेवर येत नाही. त्याचा परिणाम जलसाठ्यांवर तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. यंदा एल निनो चे संकट घोंगावत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.
यंदा देशभरातील मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाच्या सुरुवातीच्या असलेल्या जून महिन्यात देखील कमी पाऊस होणार आहे. विशेष म्हणजे "नोआ" या अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागर व वातावरण प्रशासन संबंधातील हवामान वातावरण आणि महासागराचा अभ्यास करणाऱ्या प्रमुख सरकारी संस्थेने देखील एल निनो चा प्रभाव वाढणार असल्याचे म्हटले आहे. या संस्थेच्या अंदाजानुसार मे ते जुलै २०२६ या कालावधीत एल निनो विकसित होण्याची शक्यता ८२% वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनो काळजी घ्या..
शेतकऱ्यांवर हे संकट ओढावल्यास समाजानेही विशेषतः (शहरी व नोकरवर्ग) शेतकऱ्यांसोबत राहणे, धीर देणे गरजेचे आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुख्यतः सोयाबीन, कापूस, तूर, उडीद ही खरीप हंगामातील पिके पावसावरच अवलंबून आहेत. यंदा पाऊस कमी झाल्यास या पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. जुलै ऑगस्ट महिन्यात पावसात मोठे खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट ओढाऊ शकते. धरणातील पाणी साठ्यांवरही परिणाम होऊ शकतो.. शेतकऱ्यांनी आर्थिक ताळेबंद साधताना पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.