आज बुलडाण्यात उसळणार भगवी लाट! शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात; आ.संजय गायकवाडही मैदानात; बांग्लादेशात हिंदूंवर होण्याऱ्या अत्याचाराच्या विरोधात एकजुटीने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बांग्लादेशात हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार होत आहेत. या अत्याचारांच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज बुलढाणा येथे आक्रोश –न्याय मोर्चाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने आज बुलडाण्यात हजारो हिंदू एकत्रित येणार असून शहरात भगवी लाट उसळणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने देखील परिपूर्ण तयारी केली असून शेकडो पोलीस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. दरम्यान बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड यांनीदेखील या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू बांधवांना केले आहे.

  १९७१ साली भारतानेच आपली फौज पाठवून बांग्लादेशला पाकिस्तानच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवून दिली. भारताने तिथल्या नागरिकांना वाचवली महिलांची अब्रू वाचवली. ज्या बांग्लादेशाचा जन्म भारतामुळे झाला तेच आज हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार करीत आहेत बलात्कार करीत आहेत, बौद्ध आणि ख्रिश्चन समाजालाही बांग्लादेशात टार्गेट केल्या जात आहे. ज्याप्रमाणे १९७१ ला भारताने आपली फौज पाठवली होती, त्याचप्रमाणे आता देखील केंद्र सरकारने हिंदू समाजाच्या रक्षणासाठी आपली फौज बांग्लादेशात पाठवावी अशी आपली मागणी असल्याचे आ.संजय गायकवाड म्हणाले. विधानसभेत देखील आपण याविषयी आवाज उठवणार असून आज,१० डिसेंबरला बुलडाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित मोर्चात हिंदू समाजाची एकत्रित ताकद दिसावी यासाठी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ.गायकवाड यांनी केले.

 असा आहे पोलीस बंदोबस्त...
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चासाठी बुलढाणा जिल्हा भरातून हिंदू समाज बांधव बुलढाणा शहरात दाखल होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी देखील चोख नियोजन केले आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या नेतृत्वात ३५ जवानांचे एक आरसीपी पथक, ३० जवानांचे एसआरपी पथक, ६० पुरुष पोलीस कर्मचारी, २० महिला कर्मचारी, २० वाहतूक पोलीस कर्मचारी, १ पीआय आणि ७ एपीआय, पीएसआय दर्जाचे अधिकारी मोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत...