पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे पाईप चोरीला; देऊळगाव राजात खळबळ!

 
 देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामादरम्यान जुन्या पाईपलाईनचे तुकडे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या साहित्याची किंमत सुमारे १४ हजार ५२० रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पिंपळनेर ते त्र्यंबकनगर मार्गावर नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना जुन्या डीआय पाईपलाईनचे तुकडे बाहेर काढण्यात आले होते. हे साहित्य जागेवर ठेवण्यात आले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधून त्यावर डल्ला मारल्याचे समोर आले आहे.
१३ मे रोजी संबंधित ठिकाणी पाहणी करण्यात आली असता, सुमारे २० मीटर लांबीचे प्लास्टिक पाईपचे तुकडे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर नगर परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या वतीने पाणीपुरवठा अभियंता विजया शिंगणे यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार मुसा करीत आहेत.