बुलढाणा टीबी हॉस्पिटलमध्ये चोरी; मेस रूमचे कुलूप तोडून गॅस सिलिंडरसह ४९ हजारांचे साहित्य लंपास...
Mar 14, 2026, 12:03 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील क्षय आरोग्यधाम (टीबी हॉस्पिटल) परिसरात अज्ञात चोरट्यांनी मेस रूमचे कुलूप तोडून सुमारे ४९ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धिरज शरद दर्डा (वय ३९) हे टीबी हॉस्पिटलमध्ये भांडारपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही चोरीची घटना समोर आली. दर्डा हे ४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता ड्युटी संपवून दोन अधिनस्त कर्मचाऱ्यांसह घरी गेले होते. त्यावेळी मेस रूमसह सर्व खोल्या व्यवस्थित बंद करून कुलूप लावण्यात आले होते.
मात्र दुसऱ्या दिवशी ५ मार्च रोजी सकाळी सुमारे १० वाजता ते पुन्हा ड्युटीवर आले असता मेस रूमचे कॅम्प कुलूप तोडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी मेस रूममधील २५ जुने वापरातील सिलिंग फॅन (अंदाजे किंमत १५ हजार रुपये), १२ फोल्डिंग खुर्च्या, वजन काटा, तांब्याच्या तारांसह ऑक्सिजन प्लेट तसेच मेसमधील पातेली, गॅस सिलेंडर, स्टीलचे डबे व इतर साहित्य असा एकूण सुमारे ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३४(१) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांच्या आदेशानुसार शहर पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरे करीत आहेत.