पाणी पेटले; खडकपूर्णाचे पाणी ४ तलावांत टाकण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन; ५ दिवस उलटले; उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली! आंदोलन चिघळण्याची शक्यता

 
 चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खडकपूर्णाचे पाणी चार तलावांमध्ये आणावे, या मागणीसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केलेल्या कैलास नागरे यांची प्रकृती खालावत चालली आहे. हे आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने १९ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी आपली जनावरे उपोषणस्थळी आणून आंदोलन केले दरम्यान, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन चर्चा केली. मात्र, काही तोडगा न निघाल्याने उपोषण सुरुच ठेवण्यात आले. 
खडकपूर्णा प्रकल्प भरल्यानंतर
नदी पात्रात सोडले जाणारे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा चिखलीकडे जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून अंचरवाडी फाट्यावरून तसेच गुंजाळा पाटाने अंढेरा, मेंडगाव, गुंजाळा व शिवणी आरमाळ तलावांमध्ये आणण्याच्या मागणीसाठी शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी १५ डिसेंबरपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मृद व जलसंधारण विभागाने तलावाच्या भिंतीवरील वाढलेली झाडे, झुडपे जेसीबीच्या साह्याने काढण्याची तयारी केली असता उपोषणस्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी भिंतीचे नुकसान होऊ शकते, ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर हे काम अंदाजपत्रक मंजुरीनंतर करण्याचे आश्वासन जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी लाकडे यांनी दिले.
आज एसडीओ घेणार बैठक...
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हे आज २० डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता बैठक घेणार आहेत. त्यात काय निर्णय होतो, याकडे शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.