पांगरी उगले येथील तलावाच्या भिंतीला पडले भगदाड; तलाव फुटण्याची भिती; अनेक तलावांच्या भिंतीवर वाढले झाडे झुडुपे; सिंदखेडराजा तालुक्यातील चित्र..!
Sep 3, 2025, 18:59 IST
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सिंदखेड राजा तालुक्यात गत काही दिवसांपासून हाेत असलेल्या संततधार पावसामुळे पाझर तलावांची दुरावस्था झाली आहे. तालुक्यातील पांगरी उगले येथील तलावाला भगदाड पडल्याने हा तलाव फटण्याची भिती व्यक्त हाेत आहे. त्यामुळे, या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.
पांगरी उगले शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या भागाला असलेल्या पाझर तलावांच्या भिंतीला भगदाड पडले आहे. त्यामुळे हा पाझर तलावाची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. तलाव फुटण्याच्या भितीने संपूर्ण गाव जिवमुठीत धरून असून काल ची रात्र गावकऱ्यांनी जागून काढली. परिसरात सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश्य पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाझर तलाव काठोकाठ भरला आहे. अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती करीत नसल्याने तलावातून बाहेर जाणारा सांडवा दगड मातीने बुजून गेला होता. त्यातच तलावाच्या भिंतीला मधोमध भगदाड पडले. २६ ला पडलेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस व लगेचच दुसरे दिवशी २७ ला पडलेल्या पावसामुळे तलाव काठोकाठ भरला.
तलावाला पडलेल्या भगदाडामुळे तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे याबाबत गावकऱ्यांनी संबंधित विभागाला माहिती पुरवली असून अजूनही कु़भकर्णी झोपेत असलेल्या पाटबंधारे प्रशासनाला जाग आलेली नाही.तरी संबंधित विभागाने ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे़ सिंचन विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे तलावाची भिंत सर्व बाजूंनी झाडाझुडपांमध्ये वेढलेली आहे. झाडाझुडुपांनी भरलेली तलावाची भिंतीसह तलावाचा परिसर अस्तित्वाला धोका पोहोचलेला आहे. यापूर्वी जांभोरा येथील पाझर तलाव फुटला असून शेकडो एकर शेत जमीनी वरील पीके बाधील झाली आहे. वरोडी येथील पाझर तलावाची अवस्था बिकट झाली आहे. एकांबा तलाव भरल्यानंतर सांडव्यातून पाणी मोकळे वाहत नसल्याने या तेलाच्या भिंती पर्यंत पाणी आले आहे. साखरखेर्डा येथील महालक्ष्मी तलावाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे वाढली आहे. गायखेडी तलाव झाडाझुडपांनी वेढले आहे. गुंज माथा शिवारातील दोन पाझर तलाव भरले असून धोक्याची घंटा वाजवीत आहे. राजेगाव तलाव भरले आहे. सांडव्याची दुरुस्ती नसल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाहात आहे. कोणाटी, कुंबेफळ शिवारातील तलाव हा १०० टक्के भरला असून त्याची देखभाल व दुरुस्ती महत्वाची आहे .
सर्वच लघू तलाव , पाझर तलाव यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे . तलावांची तातडीने दुरुस्ती करण्याी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.