SDO आणि तहसीलदारांचा पराक्रम! लाज सोडली.. टिप्पर पकडले..दुपारी ३ वाजता केला पंचनामा! ३.२९ ला पोलिस ठाण्यात फोटोसेशन...३ वाजून ३२ मिनिटांची रॉयल्टी पावती ग्राह्य धरून दंड न आकारता सोडले टिप्पर...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय.. अक्षरशः लाज सोडणे कशाला म्हणतात हे मेहकर SDO आणि लोणार तहसीलदारांनी दाखवून दिले..दिवसाढवळ्या अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडल्यानंतर त्याच्यावर कारवाई न करता ते सोडून देण्यात आले..विशेष म्हणजे, जेव्हा टिप्पर पकडण्यात आले,तेव्हा टिप्पर चालकाकडे गौण खनिज वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता.. तसा पंचनामाही करण्यात आला,त्यानंतर टिप्पर पोलिस ठाण्यात लावण्यात आले,तिथे फोटोसेशनही करण्यात आले.. दोन दिवस टिप्पर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले, मात्र तिसऱ्या दिवशी कोणताही दंड न आकारता टिप्पर सोडण्यात आले..जेव्हा उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी तहसीलदारांसमोर सुनावणी झाल्यानंतर त्यांच्या अहवालावरून टिप्पर सोडल्याचे सांगितले... तहसीलदार भूषण पाटलांना प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र आपल्या कामात "अतिशय व्यस्त" असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही..!

बुलडाणा
२७ मे रोजी दुपारी ३ वाजता लोणार येथील मंठा बायपासवर उपविभागीय अधिकारी श्री सानप,नायब तहसीलदार, तलाठी सचिन शेवाळे यांनी विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे टिप्पर चालक विशाल किसन पवार (रा.लोणी बु) याच्याकडून जप्त करण्यात आले. सदर टिप्पर हे जालना जिल्ह्यातील नितीन श्रीराम राठोड याच्या मालकीचे असल्याचे समोर आले. पंचनाम्यात टिप्पर चालकाकडे कोणताही परवाना नसल्याचा उल्लेख आहे. स्वतः चालकाने पंचनाम्यावर स्वाक्षरी केलेली आहे. विशेष म्हणजे हे टिप्पर पोलिस ठाण्यात लावण्यात आल्यानंतर कारवाई केल्याचा आव आणण्यासाठी टिप्पर समोर उपविभागीय अधिकारी श्री सानप,ठाणेदार श्री. सदगीर , नायब तहसीलदार मयुर ईप्पर , तलाठी सचिन शेवाळे यांनी फोटोसेशनही केले..फोटोसेशन ची वेळ ३ वाजून २९ मिनिटांची आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात हा प्रकार चालू असतांना तिकडे तहसील कार्यालयात मात्र वेगळाच प्रकार सुरू होता.."आमच सगळं नियमित सुरू असतांना आमचं टिप्पर कसं काय पकडलं?" असं कुणीतरी तहसीलच्या यंत्रणेला सुनावत होतं..त्यावर मार्ग काढण्यासाठी ३ वाजून ३२ मिनिटांनी एम एच २१, बी एच ४०३२ या पकडलेल्या टिप्परसाठी गौण खनिज वाहतुकीचा परवाना काढण्यात आला...
Buldhana
 पंचनामा झाला तेव्हा (दुपारी ३ वाजता) चालकाकडे परवाना नव्हता. पोलीस ठाण्याच्या आवारात फोटोसेशन झाले (३.२९) तेव्हाही परवाना नव्हता..मात्र अचानक ३ वाजून ३२ मिनिटांनी परवाना काढण्यात आला.. या प्रकारानंतर तब्बल दोन दिवस सदर टिप्पर पोलीस स्टेशनच्या आवारात होते..३० मे रोजी कोणतीही कारवाई न करता टिप्पर सोडण्यात आले..विशेष म्हणजे, टिप्पर सोडतांना चालकाकडे परवाना असल्याचा साक्षात्कार अधिकाऱ्यांना झाला. २७ मे रोजीच्या ३.३२ मिनिटांनी काढलेला परवाना ग्राह्य धरण्यात आला.. उपविभागीय अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर ते तहसीलदारांच्या अहवालावरून टिप्पर सोडल्याचे सांगतात.. तहसीलदार मात्र "अतिशय व्यस्त" असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही..
  दरम्यान सदर टिप्पर चालकाकडून नियमित हप्ता सर्व यंत्रणेला सुरू होता..मात्र नव्याने आलेल्या एसडीओ ना याबाबत फारशी कल्पना नव्हती.. तहसीलदारांच्या "कलेक्ट–कर" ने हा सगळा तोडगा काढल्याची चर्चा महसूल यंत्रणेत आहे. मात्र दोन्ही अधिकाऱ्यांच्या या खाबुगिरीमुळे जवळपास ३ लाख ४८ हजारांचा दंड वसूल होऊ शकला नाही.. जिल्हाधिकारी प्रविण देवरे या संपूर्ण प्रकाराची काय चौकशी करतात हे येणाऱ्या काळात कळेल.. त्यांच्याकडून जर चौकशी होऊ शकली नाही तर "सगळेच एकाच माळेचे मणी" असे कुणी म्हटले तर त्याचे तोंड आवरता येणार नाही..!