घराच्या छतावर उभारले विचारांचे मंदिर; देऊळगाव कुंडपाळ येथील ९२ वर्षीय सेवानिववृत शिक्षकांकडून डॉ. आंबेडकर–गौतम बुद्ध पुतळ्यांचे अनावरण! जयंतीदिनी अशीही मानवंदना!
Apr 15, 2026, 08:45 IST
देऊळगाव कुंडपाळ(प्रेम सिंगीं: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे एक अनोखी आणि प्रेरणादायी मानवंदना लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे पार पडली.गावातील ९२ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक उत्तम रामजी इंगळे यांनी आपल्या राहत्या घरावरच गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण करून समाजापुढे एक आदर्श ठेवला.
इंगळे यांनी स्वतःच्या खर्चातून हे पुतळे तयार करून आपल्या ‘इच्छापूर्ती’ निवासस्थानी त्यांची स्थापना केली. डॉ. आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या औचित्याने मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. या वेळी गावातील विविध मान्यवर आणि इंगळे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.समारंभानंतर उपस्थितांना खिरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. घराच्या छतावर अशा प्रकारे महापुरुषांचे पुतळे उभारण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे.
यावेळी बोलताना उत्तम इंगळे यांनी डॉ. आंबेडकर यांचे विचार, कार्य आणि नेतृत्व समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. तसेच गौतम बुद्ध यांनी दिलेला करुणा, शांतता आणि समतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या उपक्रमामुळे गावात सामाजिक जाणीव आणि प्रेरणा निर्माण झाल्याचे चित्र असून, इंगळे यांच्या या अभिनव कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.