"एसपीं"चा फैसला आता ४ जुलैला..! पोलिस अधीक्षक कार्यालयावर निलेश तांबेचा तर बंगल्यावर विश्व पानसरेंचा "राज"...!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदावरून निर्माण झालेला पेच अद्याप काही सुटायला तयार नाही. आज,२६ जूनला यावर अंतिम निर्णय येईल असे अपेक्षित असताना कॅटने ४ जुलै ची पुढील तारीख दिली आहे..त्यामुळे सध्यातरी परिस्थिती जैसे थे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर एसपी निलेश तांबे तर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्यावर भूतपूर्व एसपी विश्व पानसरे यांचा "राज" कायम आहे..

  २२ मे रोजी एसपी विश्व पानसरे यांच्या बदलीचे आदेश धडकले होते. त्याचदिवशी आयपीएस निलेश तांबे यांची बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. नियुक्ती मिळाल्यावर त्याच दिवशी श्री.तांबे यांनी बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेतला होता. दुसरीकडे आजारी रजेवर गेलेल्या विश्व पानसरे यांनी बदलीच्या विरोधात कॅट मध्ये याचिका केली. कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच बदली झाल्याने अन्याय झाल्याची भावना श्री.पानसरे यांची होती. २३ जुलैला कॅट ने श्री.पानसरे यांना दिलासा देत बदली आदेशाला स्थगिती दिली होती. या घडामोडीनंतर दिनांक ३० मे रोजी सकाळीच साडेसात वाजता श्री. पानसरे यांनी एसपी कार्यालयात येत खुर्चीचा ताबा घेतला होता. "वैद्यकीय रजेवर होतो हजर झालो" असे उत्तर पानसरे यांनी त्यादिवशी माध्यमांना दिले होते. एक खुर्ची आणि दोन अधिकारी असे चित्र त्यादिवशी दिवसभर निर्माण झाले होते. दुपारी आयजी रामनाथ पोकळे यांनी येत मध्यस्थी केली, त्यानंतर पानसरे यांनी कार्यालय सोडले होते.. खुर्चीचा हा खेळ त्यादिवशी संपूर्ण महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय ठरला होता...
याप्रकरणात ९ जुलैला सुनावणी झाली. श्री. पानसरे यांच्या बदलीची समर्पक कारणे कॅट ने शासनाला मागितली होती. त्यासाठी २६ जून पर्यंतचा वेळ वाढवून दिला होता..आज त्यावर अंतिम निर्णय येईल असे अपेक्षित असताना पुन्हा एकदा ४ जुलैची पुढील तारीख देण्यात आली आहे....
 अधिकाऱ्यांची धाकधूक....
सध्या निलेश तांबे यांच्या हाती पोलिस दलाची सूत्रे आहेत. श्री. पानसरे यांच्या याचिकेवरील कॅटचा अंतिम निर्णय प्रलंबित आहे. निर्णय आपल्या बाजूने लागेल या आशेपोटी श्री. पानसरे यांनी शासकीय बंगला ताब्यात ठेवला आहे. तिथे श्री. पानसरे यांच्या सेवेत जिल्हा पोलिस दलातील जवळ्पास १३ कर्मचारी आहेत. यात ३ कूक(स्वयंपाकी) यांचाही समावेश असल्याचे कळते. श्री.पानसरे सध्या कॅट च्या निर्णयाची वाट पाहत आहेत. दुसरीकडे श्री.तांबे यांनी आपल्या खास शैलीत कामकाजाला सुरुवात केली आहे.. मूळचे नागपूरचे असलेल्या तांबे यांचा मुक्काम सध्या तरी शासकीय विश्रामगृहातच आहे.. एकंदरीत नव्या ,जुन्या पीआय, एपिआय दर्जाच्या अधिकाऱ्यांची अजूनही धाकधूक सुरू आहे...अर्थात त्याला अनेक कारणे आहेत... असो, सध्यातरी त्यांच्या हाती ४ जुलैची वाट पाहणे एवढेच आहे... दुसरं काय करणार?