आभाळच फाटलं! चिखली तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसाने शेकडाे हेक्टरवरील पिके पाण्यात; पैनगंगेच्या काठावरील शेकडाे हेक्टरील पिकांचे नुकसान; शेळगाव आटाेळ, मिसळवाडी परिसरातही माेठे नुकसान..!

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :शहरासह तालुक्यात दाेन दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाउस हाेत असल्याने शेकडाे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वळती, सवना, उतरादा, सोमठाणा दिवठाणा आदी गावात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेळगाव आटोळ , मिसळवाडी, पिंपळवाडी, अंचरवाडी, चंदनपुर या भागातही सातच्या पावसाने पिके पाण्यात गेली आहेत. 
चिखली शहरासह ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून जाेरदार पाउस हाेत आहे. काही भागात तर ढगफुटीसदृश्य पाउस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे.
त्यामुळे, नदी आणि नाल्यांच्या काठावरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. 
देउळगाव राजा, सिंदखेड राजातील ७३ गावांना फटका 
देउळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यात १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने ७३ गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. दाेन्ही तालुक्यातील ९०२ हेक्टवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. तसेच देउळगाव राजा तालुक्यातील ६४ गावातील ४५० आणि सिंदखेड राजा तालुक्यातील ९ गावातील ४५२ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.