

पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र; चिखली तालुक्यातील ४ गावांना टँकरने पाणीपुरवठा मंजूर
Apr 18, 2025, 12:11 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यात पाणीटंचाईने गंभीर रूप घेतले असून प्रशासनाने तातडीने निर्णय घेत चार गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर केला आहे. धोडप, हिवरा नाईक, पळसखेड सपकाळ आणि किन्ही नाईक या गावांमध्ये ठराविक प्रमाणात दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली.
प्रत्येक गावासाठी टँकरने होणारा पाणीपुरवठा असा असेल –
धोडप:२,७१० लोकसंख्या व ९९८ पशुधनासाठी ६३,२०० लिटर,
हिवरा नाईक: ७९० लोकसंख्या व १,००० पशुधनासाठी ३५,३०० लिटर
पळसखेड सपकाळ: ५८० लोकसंख्या व ४९८ पशुधनासाठी २१,५६० लिटर
किन्ही नाईक: २,४७० लोकसंख्या व ७०० पशुधनासाठी ६१,९०० लिटर
ग्रामपंचायतींना टँकरने होणाऱ्या प्रत्येक खेपांची नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून गटविकास अधिकाऱ्यांनी नोंदवहीची नियमित तपासणी करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. निविदाधारकाने टँकर नादुरुस्त झाल्यास तत्काळ पर्यायी टँकर उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारा ठरत आहे.