निर्दयीपणाचा कळस! इम्तियाज शेख, फैज खान आणि मोहम्मद रियाज यांच्यासह चौघांवर गुन्हा! कत्तलीच्या उद्देशाने ४२ गोवंशांना डांबल्याचा धक्कादायक प्रकार;

 पिकअपमध्ये सहा जनावरांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक, तर ३६ बैल उपाशीपोटी बांधून ठेवले! देऊळगाव राजात मध्यरात्री पोलिसांचा छापा; १६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त!

 
 देऊळगाव राजा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुक्या जनावरांबाबत निर्दयीपणाचा कळस गाठल्याचा संतापजनक प्रकार देऊळगाव राजा शहरात उघडकीस आला आहे. कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची अमानुष पद्धतीने वाहतूक करणे आणि तब्बल ३६ बैलांना उपाशीपोटी कोंडवाड्यात बांधून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईत समोर आला आहे. एका बोलेरो पिकअपमध्ये चार गायी आणि दोन वासरांना निर्दयीपणे कोंबण्यात आले होते, तर दुसरीकडे ३६ नर गोवंशांना उपाशीपोटी डांबून ठेवण्यात आल्याचे आढळले. देऊळगाव राजा पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत एकूण ४२ गोवंशांची सुटका केली. या प्रकरणी इम्तियाज शेख खलील अहमद, फैज खान कुदरत खान, मोहम्मद रियाज यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तब्बल १६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे अंमलदार ऋषिकेश चिंचोले हे आपल्या पथकासह रात्रीच्या वेळी गस्तीवर होते. याचदरम्यान शहरातील जालना रोडवरील कॉटन मार्केट परिसरात गोवंशाची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला. त्यानंतर केलेल्या तपासणीत समोर आलेला प्रकार धक्कादायक होता.पोलिसांना एमएच-२१-बीएच-५८५० क्रमांकाची बोलेरो पिकअप आढळून आली. या वाहनात चार गायी आणि दोन वासरांना अत्यंत निर्दयीपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
जनावरांची वाहतूक करताना त्यांच्या सुरक्षिततेची आणि आवश्यक सुविधांची काळजी घेणे अपेक्षित असताना अशाप्रकारे त्यांना कोंबून नेण्यात येत असल्याचा प्रकार समोर आल्याने या वाहतुकीच्या पद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एकीकडे पिकअपमध्ये सहा गोवंश, तर दुसरीकडे ३६ बैल उपाशीपोटी!

या कारवाईतील आणखी गंभीर बाब म्हणजे कॉटन मार्केट परिसरात तब्बल ३६ नर गोवंश बांधून ठेवण्यात आल्याचे पोलिसांना आढळले. हे बैल उपाशीपोटी असल्याची माहिती समोर आली आहे.एकीकडे वाहनातून सहा गोवंशांची निर्दयीपणे वाहतूक आणि दुसरीकडे ३६ बैलांना उपाशीपोटी बांधून ठेवण्याचा प्रकार पाहता, जनावरांच्या देखभालीकडे किती गंभीर दुर्लक्ष करण्यात आले होते, याची कल्पना येते.या सर्व गोवंशांना कत्तलीच्या उद्देशाने आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण ४२ जनावरांची सुटका केली.

इम्तियाज शेख, फैज खान, मोहम्मद रियाज यांच्यासह चौघांवर गुन्हा!

या प्रकरणी पोलिसांनी इम्तियाज शेख खलील अहमद (रा. जालना), फैज खान कुदरत खान (रा. जालना), मोहम्मद रियाज (रा. गोंदेगाव, जालना) आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील गोवंश नेमके कुठून आणण्यात आले होते? त्यांना कुठे नेण्यात येणार होते? या वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा उलगडा पुढील पोलीस तपासात होणार आहे.