खानापूरवासियांना मरणानंतरही यातनाच; भरपावसात तात्पुरत्या शेडखाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ; स्मशानभूमीचे शेडच नसल्याचे चित्र; अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!
Updated: Sep 17, 2025, 14:56 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : "जगण्यात असंख्य संकटं सोसली... पण मृत्यूनंतर तरी शांतता मिळेल" अशी अपेक्षा प्रत्येकाची असते. मात्र मेहकर तालुक्यातील खानापूर गावकऱ्यांसाठी ही अपेक्षाही स्वप्नवत ठरतेय. कारण, या गावात आजवर स्मशानभूमीच नाही. त्यामुळे मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करायचे तरी कुठे? हा जिव्हाळ्याचा, पण वेदनादायी प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे.
खानापूर, खंडाळा व जामगाव या गटग्रामपंचायतीखालील खानापूरची लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे. उन्हाळा किंवा हिवाळ्यात मृत्यू झाल्यास कसेतरी शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत अंत्यविधी उरकले जातात. पण पावसाळ्यातील परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी असते. मुसळधार पावसात अंत्यसंस्कारासाठी घरच्यांना आधीच चिंता लागून राहते.
अंत्यविधीसाठी तात्पुरता मचान उभारायचा, त्यासाठी लोखंडी पाईप, झाडांच्या फांद्या, पत्र्यांचा आधार घ्यायचा, पाहुणे व गावकरी भिजू नयेत म्हणून ताडपत्री, कापड टांगायचे... अशा विवंचनेत अंत्यविधी उरकावा लागतो. मरणानंतरसुद्धा शांतता न मिळता, अपमानास्पद आणि दुःखद प्रसंगांचा सामना करावा लागतो, हे या गावकऱ्यांचे दुःख अंगावर काटा आणणारे आहे.
गावकऱ्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देत एकच मागणी पुन्हा जोर धरते – "सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी खानापूरसाठी तातडीने कायमस्वरूपी स्मशानभूमीची सोय करावी." स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतकी वर्षे उलटली, पण अजूनही मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी जागेची धडपड करावी लागते, ही खरी शोकांतिका आहे."जगण्यापुरतं सोसतोच आहोत, पण निदान मृत्यूनंतर तरी सन्मानाची व शांततेची जागा मिळावी, एवढीच आमची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रीया ग्रामस्थ व्यक्त करतात.