तीन तालुक्यातील २९८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त, १ हजार १२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी; बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर...!
 Nov 4, 2025, 11:51 IST
                                            
                                        
                                     बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सन २०२५-२६ या वर्षातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर झाली असून बुलढाणा जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावांची सरासरी पैसेवारी ४९ पैसे इतकी ठरविण्यात आली आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये उत्पादनक्षमता ५० पैशांच्या खाली राहिली आहे. जिल्ह्यातील १ हजार १२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असून, केवळ २९८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त नोंदविण्यात आली आहे.
 जिल्ह्यातील एकूण सरासरी उत्पादन ५० पैशांपेक्षा कमी राहिल्याने कृषी क्षेत्रातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी नमूद केले आहे. हंगामातील हवामानातील अनियमितता, पावसाचा अभाव आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव ही कारणे उत्पादन घटण्यामागे असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
 
  
 ५० पैशांपेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेली गावे
 
 बुलढाणा तालुक्यात ९८, चिखलीत १४४, देऊळगाव राजात ६४, मेहकरात १६१, लोणारात ९१, सिंदखेड राजात ११४, मलकापूरात ७३, नांदुरात ११२, खामगावात १४६ आणि जळगांव जामोद येथे ११९ गावांची पैसेवारी ५० पैशांखाली राहिली आहे.
  
 ५० पैशांपेक्षा जास्त अंतिम पैसेवारी असलेली गावे
 
 मोताळा तालुक्यात १२०, शेगावात ७३ आणि संग्रामपूर येथे १०५ अशी एकूण २९८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त नोंदविण्यात आली आहे.
                                    