बुलडाण्याच्या उपवनसंरक्षक कार्यालयात राष्ट्रध्वजाचा अवमान! सगळं काही डोळ्यादेखत, तरीही पोलीस म्हणतात आरोपी अज्ञात....
Jan 22, 2025, 20:54 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील राणी बगीचा परिसरात असलेल्या उपवनसंरक्षक कार्यालयात भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे उपवनसंरक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या एका रूमच्या बाहेर ठेवलेल्या टेबलवर भारताचे चार राष्ट्रध्वज कुजलेल्या आणि फाटलेल्या अवस्थेत पडून होते, मात्र असे असले तरी पोलिसांनी याबाबत कोणालाही जबाबदार न धरता अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे.
काल,२१ जानेवारीला ॲड. सतीशचंद्र रोठे मागण्यांचे निवेदन देण्यासाठी चिखली रोडवरील राणी बगीच्या परिसरात असलेल्या उपवनसंरक्षक कार्यालयात गेले होते. त्यावेळी उपवनसंरक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या एका रूमच्या समोरील टेबलवर भारताचे चार राष्ट्रध्वज कुजलेल्या आणि फाटलेल्या अवस्थेत पडून होते. याबाबत रोठे यांनी उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते राष्ट्रध्वज बऱ्याच दिवसांपासून त्याच ठिकाणी पडलेले असल्याचे समोर आले. या प्रकारानंतर रोठे यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अज्ञात?
प्राप्त माहितीनुसार सदर राष्ट्रध्वज हर घर तिरंगा अभियानाच्या दरम्यानचे असावेत. त्यावेळी सर्व शासकीय कार्यालयांना सुद्धा हर घर तिरंगा हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. कार्यालय परिसरात जर राष्ट्रध्वजाचा अवमान होत असेल तर ही बाब आतापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास का आली नाही? आलीही असली तरी त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष का केले? असे प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आरोपी अज्ञात म्हटल्यापेक्षा संबंधित कार्यालय प्रमुखांना याबाबत जबाबदार का धरण्यात येऊ नये? असा सवाल उपस्थित होत आहे...