पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा! तब्बल तीन तास घेतली अधिकाऱ्यांची बैठक: रात्री उशिरापर्यंत सुरू होती बैठक...
Jan 27, 2025, 09:22 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना.मकरंद पाटील हे २५ आणि २६ जानेवारीला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी शनिवारी जिल्ह्यातील विकासकामे, योजना, प्रकल्पांसह संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात झालेल्या या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीला आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांचेसह उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी या बैठकीत जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थितीसह कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, सिंचन प्रकल्प, पर्यटन, रस्ते व रेल्वे प्रकल्प, वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालय, सिंदखेड राजा व लोणार विकास आराखडा, वने, नगरविकास, एसटी बस व डेपो, ई-नाम सुविधा, शेततळे, घरकूल, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कौशल्य विकास व रोजगार, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प, प्रधानमंत्री सुर्यघर योजना, आवास योजना, जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, जलजीवन मिशन, मनरेगा यासह विविध विषयांचा आढावा घेतला.
या बैठकीच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांनी सर्व प्रशासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा परिचय करुन घेतला.
जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामे, प्रकल्प, योजना, उपक्रमांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.