जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करणारा नेता हरवला; माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचे निधन! सायंकाळी ५ वाजता होणार अंत्यसंस्कार...जिल्ह्यात शोककळा...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करणारे नेते म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचे आज,३ डिसेंबरला निधन झाले. मृत्यूसमयी ते ८३ वर्षांचे होते.आज सायंकाळी पाच वाजता चिखली येथील जाफ्रबाद रोडवरील वीटभट्टी जवळ त्यांच्याजवळ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत..
१९८० ते १९९५ अशी सलग १५ वर्षे भारतभाऊ बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. याच काळात राज्याचे पाटबंधारे मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या उभारणीत भारतभाऊंचे मोठे योगदान होते.
याशिवाय जिगाव प्रकल्प, पेन टाकळी प्रकल्प, कोराडी प्रकल्प, नळगंगा प्रकल्प यासह जिल्ह्यात अनेक छोटे-मोठे जल प्रकल्पांची भरणे भारत भाऊंच्या कार्यकाळात झाली.
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल असे भारत भाऊ नेहमी म्हणायचे.
गेल्या काही दिवसांपासून वृद्धत्वामुळे त्यांना शारीरिक व्याधी जडल्या होत्या. उपचारासाठी डॉ.तायडे यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलेले असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत भाऊंच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.