दुःखाच्या प्रसंगातही माणुसकीचा दीप! दिवंगत छगन भिरडे यांच्या कुटुंबीयांचा मरणोत्तर नेत्रदानाचा प्रेरणादायी निर्णय..

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही सामाजिक बांधिलकी जपत एका कुटुंबाने घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. शेगाव येथील रहिवासी दिवंगत छगन पांडुरंग भिरडे यांचे ११ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय घेत मानवतेचे अनोखे उदाहरण घालून दिले.

कुटुंबीयांच्या संमतीनंतर जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथील नेत्रदान पथकाने आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून दिवंगत छगन भिरडे यांचे नेत्रसंकलन केले. या नेत्रदानामुळे दृष्टीहीन व्यक्तींना भविष्यात दृष्टी मिळण्याची संधी निर्माण झाली असून, एखाद्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याचे मोठे कार्य या माध्यमातून होणार आहे.

या नेत्रदान प्रक्रियेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रवी शिंदे, नोडल अधिकारी अविनाश चिंचोले, डॉ. अमोल उगले, डॉ. देशमुख, नेत्रदान समुपदेशक योगेश सिरसाट, ऑफ्थल्मिक ऑफिसर प्रवीण सोळंकी, सौरभ हिवाडे व विक्की जाधव यांच्यासह नेत्रदान पथकाने सहभाग घेतला. तसेच इंजि. घाटोड यांचे विशेष सहकार्य लाभले.

‘नेत्रदान हे मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे श्रेष्ठ दान आहे,’ या भावनेतून भिरडे कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय निश्चितच समाजासाठी आदर्श ठरणारा आहे. आपल्या जिवलगाच्या निधनाचे दुःख पचवत असतानाही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचा विचार करणाऱ्या कुटुंबीयांच्या संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दिवंगत छगन पांडुरंग भिरडे यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा मानवतावादी निर्णय नेत्रदानाबाबत जनजागृतीसाठीही महत्त्वपूर्ण संदेश देणारा ठरला आहे. मृत्यूनंतरही एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश देऊन जाण्याची ही भावना खऱ्या अर्थाने माणुसकीचा दीप तेवत ठेवणारी आहे.