हुमनी अळीने शेतकरी उद्धस्त, उभ्या साेयाबीन पिकावर फिरवावा लागताेय राेटावेटर; मेरा खुर्द परिसरातील २५० एकरातील साेयाबीनवर हुमनीचा अटॅक;
आता पेरणीसाठी पैसा काेठून आणावा शेतकऱ्यांचा सवाल; मदतीसाठी लाेकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज!
Jul 16, 2025, 16:35 IST
मेरा खुर्द (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिवाचं रान करून पेरलेलं सोयाबीन, हाती कर्ज घेऊन केलेली मशागत आणि फवारण्या... सगळं काही एका अळीच्या हल्ल्याने जमीनदोस्त झालं! मेरा खुर्द परिसरातील शेतकरी आज अक्षरश: डोळ्यांत अश्रू घेऊन उभं पीक रोटावेटरने नष्ट करत आहेत.पिक हाती न आल्याने कर्ज कसे फेडावे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.
मेरा खुर्द परिरसरात २५० एकरांवरील सोयाबीन पिकावर हुमनी अळीने हल्ला केला. सुरुवातीला औषधं टाकून उपाय करण्याचा प्रयत्न झाला. पण अळीने काही ऐकलं नाही. उलट दिवसागणिक तिचं आक्रमण वाढत गेलं. अखेर, उभं पीक फस्त झालं आणि हताश शेतकऱ्यांनी शेवटचा मार्ग म्हणून रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी उसण पैशांवर अवलंबून राहून हजारो रुपयांचा खर्च केला. मात्र आता पीक गमावल्यावर, दुसऱ्यांदा पेरणी करण्यासाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. "ज्या शेतीवर आम्ही जीव टाकतो, तीच शेती आम्हाला उध्वस्त करतेय," असं बोलताना अनेक शेतकऱ्यांचे डोळे पाणावले.
या संपूर्ण संकटात ना कृषी विभागाने परिसरात एकदाही भेट दिली, ना स्थानिक प्रशासनाने धाडसी भूमिका घेतली. मदतीच्या कुठल्याच योजना नाहीत, ना नुकसान भरपाईची कुठली तरतूद. शेतकऱ्यांच्या मते, आता आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी हतबल भावना त्यांच्यात वाढत चालली आहे.
सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, या गंभीर प्रश्नावर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? २००-२५० एकर क्षेत्रातील नुकसान म्हणजे केवळ आकडा नाही, तर शेतकऱ्यांच्या घामाचे आणि आशेचे तुकडे आहेत! जिल्हाभरातील परिस्थिती पाहता, ही संख्या हजार एकरांपर्यंत गेली आहे.
जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी पुढाकार घेतला तरच या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. विधानसभेत आवाज उठवून तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा हुमनी अळीने पीक खाल्लं आणि सरकारच्या उदासीनतेने जगण्याची उमेद!