दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून जडीबुटी वाल्याला चाकूने खुपसले! चिखली शहरातील घटना....
Aug 28, 2025, 09:25 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने गावगुंडाने जडीबुटी विकणाऱ्या एका विक्रेत्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गणेश गजराजीसिंग ठाकूर (३८, रा. परसुडी रोड, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती), असे गंभीर जखमी झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे.
त्यांच्यावर चिखली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. गणेश ठाकूर हे वृद्ध आई-वडिलांसह गावोगावी पाल ठोकून जडीबुटी विक्री करून उदरनिर्वाह करतात. मागील ३५ दिवसांपासून ते शहरातील जाफ्राबाद रोड परिसरात वास्तव्यास असून, तेथे जडीबुटीची विक्री करीत होते.
याच भागातील आरोपी शेख शकील शेख इसराइल उर्फ शक्कू (२८, रा. गौरक्षण वाडी, चिखली) याने याआधीही ठाकूर यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. त्यावेळी त्यांनी वेळ मारून नेली होती. मात्र, २७ ऑगस्ट रोजी सकाळी शेख शकीलने त्यांना अडवले. गणेश ठाकूर यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शकीलने चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. खिशातून चाकू काढून त्यांच्या गळ्यावर वार केला.