कडाक्याच्या उन्हाचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा बैल दगावला; पशुपालकांना सतर्कतेचा इशारा...
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विनोद मधुकर वायाळ यांचा बैल दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास शेतात झाडाखाली बांधलेला असताना अचानक कोसळला. परिसरात तीव्र उष्णतेची लाट असल्याने उष्माघातामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेनंतर संबंधित विभागाकडे तात्काळ प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला.
या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी विनोद वायाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीकामासाठी अत्यावश्यक असलेले जनावर गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक तसेच मानसिक ताण वाढला आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, जनावरांना सावलीत ठेवणे, वेळोवेळी थंड पाणी पाजणे आणि शरीरावर पाणी शिंपडणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः दुपारच्या कडाक्याच्या उन्हात जनावरांना उघड्यावर बांधणे टाळावे, असेही सांगण्यात येत आहे.
ही घटना प्रशासनासाठीही धोक्याची घंटा ठरत असून, ग्रामीण भागात जनावरांच्या संरक्षणासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.