सावळा येथील शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासाने कंटाळले! सोयाबीन फस्त; सत्ताधारी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अनिल जगताप म्हणाले, वनविभागाच्या कार्यालयात घुसून आंदोलन करणार...
Sep 13, 2024, 13:45 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हैदौसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. बुलडाणा शहरानजीक असलेल्या सावळा येथील शेतकऱ्यांची देखील तीच अवस्था आहे. सावळा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील रोही, रानडुक्कर फस्त करत आहेत. मात्र एवढे होऊनही वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यावरून सत्ताधारी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अनिल जगताप यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सावळा येथील शेतकरी गजानन पवार यांनी २ एकर सोयाबीनची पेरणी केली होती. महागडे बी बियाणे, खते, फवारणीची औषधे यामुळे आतापर्यंत त्यांचा मोठा खर्च झाला. मात्र एका रात्रीतून रानडुक्कर व रोह्यांनी संपूर्ण सोयाबीन फस्त केली. वन विभागाने तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना विनाविलंब मदत द्यावी अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल जगताप यांनी केली आहे. विभागाने दुर्लक्ष केल्यास वनविभागाच्या कार्यालयात घुसून घेराव आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.