जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला "उमेद" चा मोर्चा!मागण्या मान्य करा नाहीतर ३ ऑक्टोबर पासून...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज्य मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियाना स्वातंत्र्य कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या सक्षम पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा करण्यात आला होता. येत्या सोमवार पर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

 

उमेद महाराष्ट्र महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज्य मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियाना स्वातंत्र्य कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या सक्षम पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे यासाठी संघटने कडून आझाद मैदानावर देखील आंदोलन केलं गेलं होत. मात्र लवकरच मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. 


   मात्र अद्यापही त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आता पुन्हा आंदोलनाची भूमिका संघटने कडून घेतली आहे . आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. येत्या सोमवार पर्यंत जर शासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही तर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. एवढेच नव्हे तर गाव  प्रभाग तालुका जिल्हास्तरावर बेमुदत धरणे आंदोलन, संप, असहकार आंदोलन, आमरण उपोषण, गाव स्तरावर प्रभात फेऱ्या, राज्यस्तरावर अधिवेशन तथा जनजागृती महामेळावे यासह ३ ऑक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करणार असल्याचे म्हटले आहे.