जिल्ह्यात जळके वाढले! सोयाबीनच्या सुड्या पेटवून या भामट्यांना मिळत काय? दिवठाणा येथे ४ एकरातील सोयाबीनची सुडी पेटवली...

 
 चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीनच्या सूड्या पेटविण्याच्या घटना जिल्ह्यात सातत्याने वाढत आहेत. जळक्या प्रवृत्तीचे लोक असले कारनामे करतात, स्वतः कष्ट करायचे नाही अन् दुसऱ्याचे चांगले सहन होत नाही अशी या जळक्या भामट्यांची वृत्ती असते..आज, ९ ऑक्टोबरच्या सकाळीच चिखली तालुक्यातील देवठाणा येथील शेतकऱ्याची ४ एकरातील सोयाबीनची सूडी अज्ञात भामट्याने पेटवून दिली..

प्राप्त माहितीनुसार दिवठाणा येथील शेतकरी नारायण माधवराव इंगळे यांची बोरगाव वस्तू शिवारात गट नंबर १० मध्ये ४ एकर शेती आहे. या शेतीत त्यांनी सोयाबीन आणि तूर पेरली होती. दहा दिवसांआधी त्यांनी सोयाबीन सोंगुन सूडी लावली होती.

  
आज,९ ऑक्टोबरच्या सकाळी कुणीतरी जळक्या प्रवृत्तीच्या व्यक्तीने या सुडीला आग लावली. यामुळे अख्खी सुडी जळून खाक झाली, या सोयाबीनचे नारायण इंगळे यांना किमान १ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र आता त्यांच्या स्वप्नांची राख करण्याचे पाप जळक्या प्रवृत्तीच्या व्यक्तीने केले.याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे.शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी याप्रकरणाचा तातडीने तपास करण्याची मागणी केली आहे.