हातापायाला भेगा पडण्याचा आजार संसर्गजन्य नाही : जिल्हा आरोग्य प्रशासनाची स्पष्टोक्ती! शेलगाव देशमुखमध्ये २० रुग्णांची नोंद; नागरिकांनी घाबरू नये – उपचार व सल्ल्याचे आवाहन...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख गावात काही नागरिकांमध्ये हात व पायाच्या तळव्यांना भेगा पडण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, हा आजार संसर्गजन्य नसून पाण्याशी याचा कोणताही संबंध नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी दिली असून नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शेलगाव देशमुख येथे तळहात व तळपायांना भेगा पडणे, साल येणे, खाज येणे अशा लक्षणांची माहिती मिळताच आरोग्य विभागाने १४ व १५ जून रोजी घरोघरी शीघ्र सर्वेक्षण केले. या तपासणीत २० व्यक्तींना अशा लक्षणांची नोंद झाली. त्यानंतर जिल्हास्तरावरून त्वरीत प्रतिसाद पथकाने गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
जिल्हा साथरोग व सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉ. बालाजी आगट यांच्या तपासणीत २० पैकी १४ रुग्णांना *एक्झिमा*, *पामोप्लांटर केराटोडर्मा* किंवा *पामोप्लांटर सोरायसीस* असे आजार असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे या रुग्णांना ही लक्षणे मागील एक ते पाच वर्षांपासून असून, त्यांच्यावर बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत.
हा आजार संसर्गजन्य नसून, तो कोणत्याही विषाणू किंवा बॅक्टेरियामुळे होत नाही. त्वचेच्या विशिष्ट प्रतिक्रियेमुळे किंवा प्रतिजनांच्या संपर्कातून हा आजार निर्माण होतो. त्यामुळे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होत नाही, असे स्पष्ट करत आरोग्य प्रशासनाने घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
शिवाय अशी लक्षणे दिसल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात त्वरित जाऊन तपासणी व उपचार घ्यावेत. डॉक्टरांनी सुचवलेली औषधे व पथ्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे.