श्रीक्षेत्र माकोडी नगरीत रामनामाचा अखंड गजर! समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराजांच्या हस्ते यज्ञकुंड प्रज्वलित; खोपडी बारस सोहळ्याला भक्तिमय वातावरणात प्रारंभ!
तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी; २२ नोव्हेंबरला पूर्णाहुती अन् तुळशी विवाहाने सांगता...
रामनामाचा प्रचार आणि प्रसार हेच जीवनाचे ध्येय मानून समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्मसेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा आणि रामनामाच्या उपासनेचा वारसा जपणाऱ्या असंख्य भाविकांसाठी खोपडी बारस हा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, भक्ती आणि सद्गुरू चरणी समर्पणाचा अनुपम सोहळा असतो. दरवर्षी या सोहळ्यानिमित्त माकोडी येथे सद्गुरू भक्तांची मांदियाळी जमते. यंदाही चातुर्मास समाप्तीच्या निमित्ताने चैतन्य मंदिर परिसरात भक्तीचा अनोखा जागर सुरू झाला आहे. आज पहाटे ४ वाजता काकड आरतीने महोत्सवाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर विधिवत पूजाविधी आणि स्थापना करण्यात आली. सकाळी ८ वाजता समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांच्या हस्ते यज्ञकुंड प्रज्वलित करण्यात आले. रामनामाच्या अखंड गजरात होमहवनाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी १२ वाजता आरती व प्रसाद वितरण, दुपारी ३ ते ५ होमहवन, तर सायंकाळी ६ वाजता दैनंदिन उपासना आणि त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
एकादशीला पायी दिंड्यांनी गजबजणार माकोडी नगरी!
शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी एकादशीनिमित्त पहाटे काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. सकाळी ७ ते ११ या वेळेत होमहवन, दुपारी आरती व फराळ प्रसाद, तर दुपारी ३ ते ५ या वेळेत यजमान जोडप्यांच्या हस्ते होमहवन पार पडणार आहे. या दिवशी मलकापूर, निरपूर, जळगाव जामोद, धामणगाव बढे यासह पंचक्रोशीतील विविध गावांमधून अनेक पायी दिंड्यांचे श्रीक्षेत्र माकोडी येथे आगमन होणार आहे. टाळ-मृदंगाचा गजर, मुखी रामनाम आणि अंतःकरणात सद्गुरूंच्या दर्शनाची ओढ घेऊन येणाऱ्या भाविकांमुळे माकोडी नगरीत भक्तीचा महासंगम अनुभवायला मिळणार आहे. सायंकाळी सामूहिक उपासनेनंतर भाविकांना फराळ प्रसादाचे वितरण करण्यात येईल. रात्री ८ वाजता ह.भ.प. वासुदेव शास्त्री महाराज (वाघजाळ फाटा) यांच्या कीर्तनातून भक्तांना अध्यात्मिक विचारांची मेजवानी मिळणार आहे.
२२ नोव्हेंबरला श्रीहरी महाराजांच्या हस्ते पूर्णाहुती; सद्गुरूंच्या अमृतवाणीकडे भाविकांचे लक्ष!
रविवार, २२ नोव्हेंबर रोजी खोपडी बारस सोहळ्याचा मुख्य दिवस असून पहाटे काकड आरतीनंतर सकाळी ८.३० वाजता समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांच्या हस्ते रामनाम जपाची यज्ञकुंडात पूर्णाहुती अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता श्रीहरी महाराजांचे मुख्य आध्यात्मिक मार्गदर्शन होणार असून त्यांच्या अमृतवाणीतून रामनामाचे महत्त्व, सद्गुरू भक्ती आणि अध्यात्मिक जीवनाचा संदेश भाविकांना मिळणार आहे. यावेळी श्रीहरी महाराजांच्या हस्ते उपस्थित भक्तांना कापड प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली निरपूरकर यांचे कीर्तन होईल. दुपारी नैवेद्य आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पवित्र तुळशी विवाह सोहळ्याने या तीनदिवसीय धार्मिक महोत्सवाची मंगलमय सांगता होणार आहे.
दरम्यान, महोत्सवानिमित्त अखंड पहाऱ्यालाही प्रारंभ झाला असून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने ही सेवा बजावत आहेत. रामनामाच्या अखंड साधनेतून मनःशांती, सद्गुरूंच्या कृपेतून जीवनाला दिशा आणि सामूहिक भक्तीतून आध्यात्मिक एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा माकोडीच्या धार्मिक परंपरेचे वैभव अधोरेखित करणारा ठरत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या भक्तिमय पर्वामुळे श्रीक्षेत्र माकोडीतील चैतन्य मंदिर परिसरात जणू रामनामाची गंगा अवतरल्याची अनुभूती भाविकांना मिळत आहे.