घंटी वाजली, शाळा भरली! बैलगाडीतून विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले बैलगाडीचे सारथ्य! मादणी येथील प्रवेशोत्सव चर्चेत....
Jun 23, 2025, 14:03 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळांची घंटा आज पुन्हा एकदा वाजली आणि विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील मादणी गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सव यंदा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडला.
देशाचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः बैलगाडी हाकत विद्यार्थ्यांना शाळेत आणून शाळा प्रवेशदिन संस्मरणीय बनवला. गाजावाजा करत, ढोल-ताशांच्या निनादात गावातून बैलगाडीतून विद्यार्थ्यांना आणले गेले. शाळेच्या प्रवेशद्वारी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मंत्री जाधव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
या खास प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अद्ययावत शालेय साहित्याचाही लाभ मिळाला. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या जवळपास १७ हजार विद्यार्थ्यांना आधुनिक स्कूल बॅग आणि शालेय गणवेश देण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून, त्याचा शुभारंभ मादणी शाळेपासून करण्यात आला.
या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, “ज्या शाळेत मी शिकलो, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आज स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शालेय साहित्य मिळावे आणि शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, यासाठी या बॅग वाटपाचा प्रारंभ मादणी येथून करण्यात आला आहे.”
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी नव्याने प्रेरणा जागवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.