दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत! जिल्ह्यात आतापर्यंत केवळ अडीच टक्के पेरण्या; गेल्यावर्षी २४ जूनपर्यंत ३५ टक्के क्षेत्रावर झाली होती पेरणी...
यंदाच्या हंगामात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पेरण्या जवळपास ठप्प झाल्या होत्या. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २० हजार ३६६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच अवघ्या अडीच टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये बहुतांश क्षेत्र घाटाखालील कपाशी लागवडीचे असून शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन व्यवस्थेचा आधार घेत पेरण्या केल्या आहेत. नैसर्गिक पावसाच्या प्रतीक्षेत असलेले बहुतांश शेतकरी मात्र अद्यापही पेरणीपासून दूर होते.
विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदाची परिस्थिती पूर्णतः वेगळी दिसून येत आहे. गेल्या वर्षी २४ जूनपर्यंत जिल्ह्यात सुमारे ३५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, तर यंदा हा आकडा अडीच टक्क्यांवरच थांबला आहे. त्यामुळे पावसाच्या विलंबाचा थेट परिणाम खरीप हंगामाच्या सुरुवातीवर झाल्याचे स्पष्ट होत आहे.
२२ आणि २३ जून रोजी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे आता सोयाबीन पेरणीचा शुभारंभ होणार आहे. अनेक भागांतील शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले असून पावसाचा पुढील जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत पेरणीचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
मात्र, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास उगवण क्षमता कमी होण्याचा आणि दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याचा धोका असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
दरम्यान, पुढील पाच दिवस जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ ते २७ जूनदरम्यान बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरल्यास खरीप हंगामाला मोठा आधार मिळणार असून सोयाबीनसह इतर पिकांच्या पेरणीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.सध्या तरी पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले, तरी पुढील काही दिवसांत होणाऱ्या पावसावरच यंदाच्या खरीप हंगामाचे चित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.