हिरकणी महिला प्रभागसंघाची वार्षिक सभा उत्साही वातावरणात माळवंडीत संपन्न; नवउद्योजकतेसाठी 'मिशन Z+' सारख्या उपक्रमांना मिळाले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पाठबळ...
Jun 7, 2025, 08:53 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बुलढाणा येथील हिरकणी महिला प्रभागसंघ रायपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा ५ जून रोजी ग्रामपंचायत माळवंडी येथे पार पडली. या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बचत गट, उद्योजकता विकास, उत्पादनाचे पॅकेजिंग, ब्रँडिंग, गुणवत्ता नियंत्रण याबाबत माहिती दिली. विशेषतः 'मिशन Z+' उपक्रमाची माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, १ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी NEET, JEE, CET सारख्या स्पर्धा परीक्षांच्या मोफत क्लासेसची व्यवस्था केली जाणार आहे.
सभेला अति. कार्यकारी अधिकारी श्री. मोहन, प्रकल्प संचालक राजेश इंगळे, डेप्युटी सीईओ (महिला व बालकल्याण) श्री. एंडोले, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव, जिल्हा व्यवस्थापक श्री. तऱ्हेकर, माळवंडी सरपंच संगीता चव्हाण, उपसरपंच अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
सभेच्या प्रारंभी पर्यावरण दिनानिमित्त उपस्थित अधिकारी, कर्मचारी व महिलांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी महिलांच्या व्यवसायिक संकल्पनांवर मार्गदर्शन करताना सांगितले की, समूहांतील महिलांनी एकमेकींच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास संपूर्ण समूह आर्थिकदृष्ट्या बळकट होईल.
या वार्षिक सभेत गतवर्षीच्या कामाचा आढावा, पुढील वर्षाचे नियोजन, धोरणात्मक निर्णय, उपसमित्यांचा आढावा, सभासदत्व व भागभांडवल विषयक निर्णय, प्रभागसंघाच्या कामकाजावर चर्चा तसेच वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
सभा हिरकणी महिला प्रभागसंघ अध्यक्ष सविता तरमळे, सचिव ज्योती सुरुशे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याशिवाय तालुका अभियान व्यवस्थापक श्रीपाल सोनटक्के, व्यवस्थापक सिंगतकर, प्रभाग समन्वयक निलेश इंगळे, गिरीधर हिवाळे, दत्तात्रय तळेकर, लेखापाल विद्या पाटोळे व रायपूर प्रभागातील विविध ग्रामसंघ पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रभागसंघाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.