शिवीगाळ करण्यास हटकले, अन् संतापलेल्या तरुणाने उपसरपंचावर चाकूनेच केला वार! घाटपुरीतील राणी लक्ष्मीबाई नगरात खळबळ; उपसरपंच योगेश कोल्हे जखमी, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : परिसरात मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला जाब विचारणे घाटपुरीच्या उपसरपंचांना चांगलेच महागात पडले. ‘परिसरात शिवीगाळ का करतोस?’ असे हटकताच संतापलेल्या तरुणाने उपसरपंच योगेश कोल्हे यांच्या हातावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळही केली. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी घाटपुरी येथील राणी लक्ष्मीबाई नगरात घडली असून, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घाटपुरी (ता. खामगाव) येथील उपसरपंच योगेश मोतीराम कोल्हे (वय ४०) हे घरी असताना परिसरातून शिवीगाळ केल्याचा आवाज त्यांच्या कानावर आला. परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने ते आवाजाच्या दिशेने गेले. तेथे कुशाग्र जगताप हा तरुण शिवीगाळ करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी कोल्हे यांनी त्याला अशा प्रकारे परिसरात शिवीगाळ करू नकोस, असे सांगत हटकले.

मात्र, साध्या शब्दांत केलेला जाब विचारणे तरुणाला चांगलेच झोंबले. याचाच राग मनात धरून कुशाग्र जगताप याने कोल्हे यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कोल्हे यांच्या हाताला दुखापत झाली. सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून उपसरपंचावरच चाकूने वार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर योगेश कोल्हे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कुशाग्र जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), २९६, ३५१(३) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.