खून करून दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस केले जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनानंतर फरार असलेला आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या सापळ्यात अडकला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधमोहीमेला गती देण्यात आली असून त्यातून ही मोठी कामगिरी साध्य झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पोलीस निरीक्षक  सुनिल अंबुलकर (स्थानिक गुन्हे शाखा) यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्था. गु. शा. पथकाने विशेष मोहिम राबवून आरोपींचा शोध सुरू केला.


याच मोहिमेअंतर्गत १९ नोव्हेंबर २०२५ रोजी रायपूर पोलीस स्टेशनच्या अपराध क्र. 16/2016, कलम 302, 201, 120(b) भादंवि अशा गंभीर खुनाच्या गुन्ह्यात मागील दहा वर्षांपासून फरार असलेला शेख इरफान उर्फ काल्या शेख अश्पाक (वय 33, रा. मिलींदनगर, बुलढाणा) हा बुलढाणा शहरात दाखल झाल्याची माहिती पथकाला मिळाली. तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी रायपूर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.


दरम्यान, 18 नोव्हेंबर 2025 रोजी देऊळगावराजा पोलीस स्टेशनमधील अप. क्र. 269/2024, कलम 309(6), 310 बीएनएस मधील गुन्ह्यात फरार असलेला अभय दिलीप डोंगर (वय 24, रा. कन्हैय्यानगर, जालना) यास जालना शहरातून ताब्यात घेऊन दे. राजा पोलीसांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक  अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक  सुनिल अंबुलकर यांच्या आदेशान्वये पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, पो.ना. अनंता फरतळे, सुनिल मिसाळ, पोलिस कॉन्स्टेबल गणेश वाघ, मनोज खरडे आणि महिला पोलिस आशा मोरे (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.