भीषण! मामा–भाच्याला टिप्पर ने उडवले! भाच्याचा मृत्यू , मामा गंभीर..! मामाच्या मुलीसोबत जुळले होते लग्न, संसार थाटण्याआधीच मोडला....मोताळा तालुक्यातील दुर्दैवी घटना...

 

 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मामाच्या मुलीसोबत सोयरिक जुळल्याच्या अवघ्या काही दिवसांतच मामा-भाच्याच्या कुटुंबीयावर अपघाताने शोककळा पसरली. भरधाव वेगातील विटांच्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने उपवर युवक ठार, तर मामा गंभीर जखमी झाला. मोताळा तालुक्यातील तालखेड फाट्यावर ही दुर्दैवी घटना घडली.
अजय संजय कावणे (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील रहिवासी असलेला अजय याची सोयरिक वडगाव येथील मामा सुरेश मुरलीधर लोखंडे (४३) यांच्या मुलीसोबत जुळली होती. लग्नाची तारीख निश्चित करायची राहिली होती. दरम्यान, दाताळा येथे नातेवाइकाकडे लग्न सोहळा असल्याने अजय कावणे हा मामा सुरेश यांना घेण्यासाठी वडगाव येथे गेला. तेथून ते एमएच-१९-ईस-००४१ क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. मात्र, पुढे तालखेड फाट्याजवळ काळ आडवा आला. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विटांची वाहतूक करणाऱ्या एमएच-१६-एवाय-०९३०
क्रमांकाच्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. यात अजयचा मृत्यू 
झाला. गंभीर जखमी असलेल्या सुरेश लोखंडे यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.
लग्नाच्या आशेने सुखी, संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या अजयचे विवाहाचे स्वप्न अधुरे राहिले.
राजूरजवळ पकडला टिप्पर
अपघातानंतर चालक टिप्पर घेऊन फरार झाला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने राजूर येथे हा टिप्पर पकडला. चालक आणि मालक ज्योतीराम राठोड मोहेगावचा रहिवासी आहे. बोराखडी पोलीस स्टेशनचे पीआय बालाजी सेंगेपल्लू तसेच पीआय नाचनकर, प्रवीण पडोळ, एस. आय. खर्चे यांनी वाहन पोलीस ठाण्यात जप्त केले...