भीषण! झोपेची डुलकी लागली अन् नव्या कोऱ्या कारचा अपघात! दोघांचा जागीच मृत्यु; तिघे गंभीर! समृद्धी महामार्गावर अपघात....
Apr 23, 2025, 14:55 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका काही थांबताना दिसत नाही. विशेषता सर्वाधिक अपघात समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्हा हद्दीत होत आहेत. आज,२३ एप्रिलला पहाटे नव्या कोऱ्या कारचा अपघात झाला. चालकाला झोपेची डूलकी लागल्याने कार पुलावरील कठड्याला धडकली, यात दोघांचा जागीच मृत्यु झाला असून तिघे गंभीर जखमी आहेत.. अपघातातील ठार व मृतक मूळचे बिहारचे असून ते ठाण्यावरून बिहार कडे जात होते
विकास कुमार (२८) , गुड्डू सिंग (२८) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर प्रदीप सुरेश चव्हाण (३८), मनीष कुमार प्रेमचंद सिंग (२८) आणि नितेश कुमार (२८) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉर वर मेहकर तालुक्याच्या हद्दीत चॅनेल नंबर २९९.१ वर हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस ठाण्यातील स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत, पोलीस अंमलदार गणेश उबाळे, अमोल हरमकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातग्रस्त कार नवी कोरी होती, ती नुकतीच विकत घेतल्याचे कळते.