भालगावसाठी पाणीटंचाई निवारणार्थ टँकर मंजूर! ३ हजार २७३ नागरिकांसह १,६२० पशुधनाला दिलासा; दररोज ९६ हजार ६०० लिटर पाणीपुरवठा
May 15, 2026, 13:10 IST
बुलढाणा, (जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली तालुक्यातील भालगाव येथे तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत गावासाठी पाणीपुरवठा टँकर मंजूर केला आहे. नियमित टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली.,
भालगाव येथील ३ हजार २७३ लोकसंख्या तसेच १ हजार ६२० पशुधनासाठी दररोज एका टँकरच्या माध्यमातून ९६ हजार ६०० लिटर पाणीपुरवठा केला जाणार आहे. वाढत्या उन्हामुळे गावात निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
टँकरद्वारे करण्यात येणाऱ्या प्रत्येक खेपेची नोंद ग्रामपंचायतीने नियमित ठेवावी, तसेच या नोंदवहीची तपासणी गटविकास अधिकाऱ्यांनी सातत्याने करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय टँकर नादुरुस्त झाल्यास संबंधित निविदाधारकाने तात्काळ पर्यायी टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
दरम्यान, टँकर मंजुरीमुळे भालगाव ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे चित्र दिसून येत आहे.