जिल्हाधिकारी कार्यालयात तांडव! पुरवठा विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना खाऊ घालायला आणली खिचडी, भाकरी अन् ठेचा! शिवसनेचे संतोष भुतेकर म्हणाले, लोकांना
असलं खाऊ घालता, तुम्ही खाऊन पहा... जिल्हा पुरवठा अधिकारी गायब..
Jan 5, 2026, 19:16 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील नागरिकांना पुरवठा विभागाच्या वतीने निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा होतोय.. अळ्या असलेले तांदूळ, काळया रंगाची ज्वारी स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून जिल्ह्यात वितरित झालेली आहे. हे धान्य माणसांना खाण्यासारखे तर सोडाच जनावरांना खाऊ घालण्याच्या योग्यतेचे नाही.. शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आक्रमक झाले आहेत.. ज्या धान्याचे वितरण झाले, त्याच तांदळाची खिचडी, ज्वारीची भाकरी अन् चविला ठेचा असा डब्बा घेऊन भुतेकर थेट जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात पोहोचलेत.. अधिकाऱ्यांना ही भाकरी आणि खिचडी खाऊ घालायची आहे, मात्र अधिकारी खायला तयार नाहीत.. जिल्हा पुरवठा अधिकारी दुपारी दोन पासून गायब आहेत... जोपर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी खिचडी आणि भाकरी खात नाही तोपर्यंत पुरवठा विभागाचे कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.. भुतेकर यांच्यासोबत मंडपगावचे सरपंच सचिन कदम, शिवसेना विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख ओम गायकवाड हे देखील आंदोलनाला बसले आहेत..
भुतेकर यांनी गेल्या महिन्यातच निकृष्ट दर्जाच्या धान्याविषयी पुरवठा विभागाला निवेदन दिले होते. मात्र वारंवार शासनाकडून निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण होते आहे.. शासनाकडून वितरीत होत असलेल्या तांदळात अळ्या आहेत, भुसा आहे..ज्वारीचा रंग काळा आहे.. असले धान्य खाऊन विषबाधा होण्याची शक्यता आहे.. मात्र संबंधित विभाग दखल घ्यायला तयार नाही..अखेर भुतेकर यांनी आक्रमक भूमिका घेत वितरित केलेला धन्याचे जेवण बनवूनच अधिकाऱ्यांना खायला आणले आहे..जोपर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी येत नाहीत, खिचडी आणि भाकरी खात नाहीत तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण तयार झाले आहे..
