BREAKING नवरात्रात उपवास धरणाऱ्यांनो काळजी घ्या! पिंपळगाव सोनारा गावातील २५ जण हॉस्पिटलमध्ये; नेमकं काय झालं...

 
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवरात्रीच्या उपवासाच्या पहिल्याच दिवशी भगर खाल्ल्याने २५ जणांना विषबाधा झाल्याचे समोर येत आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा गावात भगरीच्या पिठातून विषबाधा झाली आहे. आतापर्यंत २५ जण विविध रुग्णालयात उपचारासाठी पोहोचले आहेत. साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील ८ ते १० जणांवर उपचार सुरू आहेत.
 नवरात्र उत्सवानिमित्त अनेक भाविक ९ दिवसांचा उपवास करतात. पिंपळगाव सोनारा येथील अनेकांनी उपवास धरले आहेत. भगरीच्या पिठापासून बनवण्यात आलेल्या भाकरी खाल्ल्याने रात्रीपासून अनेकांना मळमळ उलट्या व्हायला सुरुवात झाली, काहींना चक्कर येत होते.
असे जवळपास २५ जण आज विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पोहोचले. साखरखेर्डा येथील प्राथमिक रुग्णालयात देखील काही रुग्ण पोहचले आहेत, त्यांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.
का होते भगरीतून विषबाधा....?
गेल्या वर्षी बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खापरखेड - सोमठाणा येथे भगरीतून विषबाधा झाली होती. हे प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजले होते. दरम्यान भगरीतून विषबाधा का होतेय? याबाबत बुलडाणा लाइव्ह ने वैद्यकीय तज्ञांशी चर्चा केली. भगर खरेदी करताना आधी एक्सपायरी डेट तपासावी, मुदतबाह्य भगरीतून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते असे डॉक्टरांनी सांगितले. शिवाय भगरीवर मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव होतो. अशा भगरीचे पीठ केल्यानंतर बुरशी लागलेली दिसत नाही मात्र ते पीठ खाण्यात आल्याने वाईट परिणाम होतात. भगर खरेदी करताना शक्यतोवर पाकीट बंद भगर खरेदी करावी, घरी आणल्यानंतर वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवावी व कोरड्या डब्यात ठेवावी असे डॉक्टरांनी सांगितले.