ज्ञानेश कुमारांना ठोकल्या प्रतीकात्मक बेड्या; गाढवावर मुखवटा लावून काँग्रेसचा संताप, पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखला!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून देशातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच, बुलडाण्यात काँग्रेसने आक्रमक आंदोलन करत त्यांचा निषेध नोंदवला. ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून हटवावं, या मागणीसाठी बुलडाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने जयस्तंभ चौकात जोरदार एल्गार करण्यात आला.

 

आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांना प्रतीकात्मक बेड्या ठोकून निषेध व्यक्त केला. यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

या आंदोलनातील लक्षवेधी प्रकार म्हणजे आंदोलकांनी गाढवावर ज्ञानेश कुमार यांचा मुखवटा लावून निषेध नोंदवला. त्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याला आग लावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे काही काळ जयस्तंभ चौक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार पाटील, मलकापूरचे माजी आमदार राजेश एकडे, विश्वजीत पडोळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करून त्यांचं निलंबन करण्यात यावं, अशी मागणी असलेलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना साद करण्यात आलं.