स्वप्निल गुप्तांचा नादच भारी! दरवर्षी मुक्ताईच्या पालखीसाठी नवीन बैलजोडी; यंदाच्या 'भक्ती-शक्ती'ने वेधलं साऱ्यांचं लक्ष... पंढरीपर्यंत होणार पालखीचे भोई..!

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): काही जण बैलजोडीचा छंद जोपासतात, काही जण वारीची सेवा करतात; पण या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम घडवून एक आगळीवेगळी परंपरा जपणारे नाव म्हणजे अंचरवाडी (ता. चिखली) येथील प्रगतिशील शेतकरी स्वप्निल गुप्ता (अप्पूशेठ). संत आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीप्रती असलेली त्यांची निस्सीम श्रद्धा आणि सेवाभाव दरवर्षी एका नव्या उपक्रमातून दिसून येतो. पालखीच्या सारथ्यासाठी दरवर्षी नवी बैलजोडी खरेदी करण्याची त्यांची परंपरा यंदाही कायम राहिली असून, 'भक्ती' आणि 'शक्ती' या नावाची देखणी खिल्लारी बैलजोडी सध्या वारीतील विशेष आकर्षण ठरत आहे.

स्वप्निल गुप्ता यांना उत्कृष्ट बैलजोडींचा छंद असला, तरी त्यामागे केवळ हौस नाही, तर संतांविषयीची अपार श्रद्धा दडलेली आहे. त्यांच्या गोठ्यात विविध जातींचे दर्जेदार आणि देखणे बैल आहेत. मात्र दरवर्षी मुक्ताईच्या पालखीच्या सेवेसाठी नव्याने बैलजोडी खरेदी करून ती पालखीच्या सेवेला अर्पण करण्याची त्यांची परंपरा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

यंदा त्यांनी खरेदी केलेली खिल्लारी जातीची बैलजोडी उंचपुरी, मजबूत बांध्याची, पांढराशुभ्र रंगाची आणि भव्य शिंगांची आहे. 'भक्ती' आणि 'शक्ती' अशी ठेवलेली अर्थपूर्ण नावे या बैलजोडीच्या सेवाभावाचीच साक्ष देतात. वारकरी आणि भाविक या बैलजोडीकडे कौतुकाने पाहत असून, अनेक जण तिच्यासोबत छायाचित्रेही काढत आहेत.२८ जून रोजी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचे बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाटात आगमन झाल्यानंतर या बैलजोडीने पालखीचे सारथ्य स्वीकारले. आता पंढरपूरपर्यंतचा संपूर्ण प्रवास 'भक्ती' आणि 'शक्ती' ही बैलजोडी करणार आहे. या प्रवासात बैलांची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांच्या चारा, पाणी, विश्रांती आणि आरोग्याची योग्य काळजी घेतली जावी यासाठी स्वप्निल गुप्ता यांनी स्वतंत्र माणसेही नियुक्त केली आहेत.

 

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात संतपरंपरेशी नाळ जोडून निस्वार्थ भावनेने सेवा करणारे हात दुर्मिळ होत चालले आहेत. अशा काळात स्वप्निल गुप्ता यांनी जपलेली ही परंपरा केवळ त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक नाही, तर वारकरी संप्रदायातील सेवाभावाचा आदर्श ठरत आहे. त्यामुळेच दरवर्षी मुक्ताईच्या पालखीसोबत दिसणारी त्यांची नवी बैलजोडी ही भाविकांसाठी आकर्षणाचा विषय ठरते, तर स्वप्निल गुप्ता यांचे नाव सेवाभावी वारकरी म्हणून आदराने घेतले जाते.वारी ही भक्तीची, समर्पणाची आणि सेवाभावाची परंपरा आहे. त्या परंपरेला आपल्या कृतीतून बळ देणारे स्वप्निल गुप्ता यांचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, यंदाची 'भक्ती' आणि 'शक्ती' ही बैलजोडी वारीतील चर्चेचा विषय बनली आहे.