पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचा संघटीत गुन्हेगारीवर कडक प्रहार;मलकापूरच्या कुख्यात टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत मोठी कारवाई

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारीला कायमस्वरूपी आळा घालून सामान्य नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे संरक्षण व्हावे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी संघटीत गुन्हेगार टोळ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार मलकापूर येथील एका कुख्यात संघटीत गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन एमआयडीसी, मलकापूर येथील गुन्हा क्रमांक १३८/२०२५ अंतर्गत (भा.न्या.सं. कलम १०३(१), १०९, ११८(१), १८९(२)(४), १९०, १९१(१)(३)) नोंदविण्यात आलेल्या प्रकरणात किरकोळ कारणावरून नऊ आरोपींनी संघटीतपणे सतीश गजानन झाल्टे (रा. पिंप्राळा) याचा पोटात चाकूने वार करून निर्घृण खून केला होता. या घटनेत साक्षीदारांनाही अमानुष मारहाण करण्यात आली होती.
तपासादरम्यान प्रमुख आरोपी संकेत सुनिल उन्हाळे (रा. मलकापूर) व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मारहाण यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या टोळीपासून जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला मोठा धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.
मकोका कारवाईस विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी
सदर प्रकरण विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्याकडे मकोका अंतर्गत कारवाईसाठी सादर करण्यात आले. त्यानंतर रामनाथ पोकळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांनी प्रस्तावास मंजुरी देत खालील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले.
संकेत सुनिल उन्हाळे (२२), रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर,
साहिल सुधाकर पालवे (१८), रा. गोपालकृष्ण नगर, मलकापूर,
देव तिलकसिंग राजपूत (२४), रा. रामवाडी, मलकापूर,
अरविंद उर्फ गबया अजय साळुंके (१९), रा. लक्ष्मी नगर, मलकापूर,हर्षल सुभाष घोंगटे (२३), रा. आव्हा, ता. मोताळा,
गणेश विजय वायडे (२१), रा. संत ज्ञानेश्वर नगर, मलकापूर,
कौशल संतोष घाटे (२२), रा. पवनसुत नगर, मलकापूर,
आदित्य जनार्दन वानखेडे (२४), रा. मंगलगेट, मलकापूर (फरार),
ऋषिकेश रामलाल इंगळे (२३), रा. माता महाकाली नगर, मलकापूर (फरार) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
नववर्षात गुन्हेगारांना स्पष्ट इशारा
नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच संघटीत गुन्हेगारी टोळीवर करण्यात आलेल्या या मकोका कारवाईमुळे जिल्ह्यातील शरीराविरुद्ध व मालमत्तेसंबंधी गुन्ह्यांवर नियंत्रण येण्यास मदत होणार असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे (बुलढाणा) यांच्या आदेशानुसार तसेच
अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व
अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी कारवाईत
पो.नि. सुनील अंबुलकर (स्था. गु. शा. बुलढाणा),
सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर,पो.हे.कॉ. संजयकुमार भुजबळ,पो.ना. राकेश नायडू,
पो.हे.कॉ. राजेश बावणे,
पो.कॉ. गजानन वरखेडे (पो.स्टे. एमआयडीसी, मलकापूर)
यांचा मोलाचा सहभाग होता.