स्त्रियांच्या स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत रविवारी मार्गदर्शन शिबीर! राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे आयोजन; शिबिराचा लाभ घेण्याचे संस्थाध्यक्षा मालती शेळके यांचे आवाहन....
Jan 17, 2025, 18:10 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्यावतीने स्त्रियांच्या स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात १९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता हे शिबीर होणार आहे. माता- भगिनींनी या मोफत मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्षा मालती शेळके यांनी केले आहे.
शिबिराचे उदघाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. शाहिनाताई पठाण यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलचे स्तन विकार तज्ञ आणि स्तन कर्करोग तज्ञ डॉ.आशुतोष तोंडारे, एमआयटी हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूटच्या स्त्री रोग तज्ञ आणि स्त्री कर्करोग तज्ञ डॉ. शिल्पी वर्मा, आय बॉक केअर हॉस्पिटलच्या मुख कर्करोग तज्ञ डॉ. रचिता बाहेती तोंडारे प्रमूख मार्गदर्शन करणार आहेत.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. मात्र धावपळीच्या जीवनात सर्वांचेच कमीअधिक प्रमाणात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतांना महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. पूर्वी ६० ते ७० वर्षे वयात होणारे आजार आज चाळीशीत किंबहुना त्याही पेक्षा कमी वयात जडत असल्याचे चित्र आहे. सध्या स्त्रियांच्या स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जास्त तक्रारी येत आहेत. त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.