SUNDAY SPECIAL शब्दांचा जादूगर गणेश! तब्बल ४ हजारांपेक्षा अधिक कार्यक्रम बहारदार सूत्रसंचालनाने गाजवले!

 फडणवीस, शिंदे,ठाकरे, पवार, गडकरींच्या सभा गाजवल्या! लग्नसमारंभातही धुंदळेंच्या शब्दांची जादू.....
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !!
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।शब्द वाटू धन जनलोका !!
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देचि गौरव पुजा करू !!
शब्दाची महती सांगणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग.. शब्दच उभारतात घरे आणि दारे आणि शब्दच विझवतात पेटलेले निखारे असेही म्हटल्या जाते. याच शब्दांच्या भरवशावर चिखली येथील गणेश धुंदळें यांनी केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आहे. ओघवती शैली, शब्दांवरील पकड, मराठी साहित्यावरील प्रभुत्व आणि अचूक समयसूचकता यामुळे गणेश धुंदळें यांचे निवेदन( सूत्रसंचालन) करण्यात बहरत जाते.. अत्यंत कमी वयात निवेदक म्हणून सुरू केलेला प्रवास आता गणेश धुंदळें यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे..

Dhundale

 अत्यंत खडतर परिस्थितीतून गणेश यांनी निवेदक म्हणून प्रवास सुरू केला. मराठी कवितांची आणि साहित्यांची आवड मुळातच असल्याचे शेकडो कविता, चारोळ्या गणेश धुंदळें यांना तोंडपाठ आहेत. त्यामुळे कार्यक्रम राजकीय असो वा सामाजिक, शैक्षणिक वा लग्न समारंभातील सूत्रसंचालन धुंदळें यांचा प्रत्येक शब्द हा "नेमका" असतो. या नेमकेपणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून गणेश धुंदळें यांना सूत्रसंचालनाठी बोलावण्यात येते. कार्यक्रम कसाही आणि कोणताही असला तरी तो फुलवण्याची ताकद गणेश धुंदळे यांच्या शब्दांत आहे..
Ganesh dhundale
४ हजारांपेक्षा अधिक कार्यक्रम गाजवले...
२००९ ला अगदी कमी वयात गणेश यांनी निवेदक म्हणून प्रवासाला सुरुवात केली. खरेतर त्यावेळी निवेदक म्हणून आपण एवढी मोठी मजल मारू असे गणेश धुंदळे यांना वाटलेही नव्हते. मात्र वाचनाचे सातत्य, प्रत्येक कार्यक्रमातील निवेदनाचे वेगळेपण आणि अचूक शब्दफेक 
यामुळे गणेश धुंदळे शब्दाचे जादुगार ठरले. रामदास आठवले यांच्या जाहीर सभेपासून राजकीय कार्यक्रमातील निवेदनाची सुरुवात झाल्याचे गणेश धुंदळे सांगतात. त्यानंतर आतापर्यंत शेकडूनच्या संख्येत राजकीय सभा धुंदळे यांच्या निवेदनामुळे गाजल्या. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शरद पवार,अजित पवार, खा. निलेश लंके, स्व .विनायकराव मेटे या दिग्गजांचा समावेश आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी चिखलीत सभेत गणेश धुंदळे यांच्या निवेदनाचे कौतुक करून त्यांना एक पेनही भेट दिला होता..आतापर्यंत राजकीय सभा आणि लग्नसमारंभ असे नियम ४ हजारांपेक्षा अधिक कार्यक्रमात गणेश धुंदळे यांनी सूत्रसंचालन केले असून वयाच्या मानाने हा सुद्धा एक रेकॉर्डच आहे.म्हणूनच तर म्हणतात गणेशरावांना शब्दाचा जादूगर.....