SUNDAY SPECIAL विरोधकांच्या यात्रा आणि आंदोलनांनी व्यापला राजकीय स्पेस! बुलडाणा जिल्ह्यातील चित्र...

 
Buldhana
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकांमुळे महाविकास आघाडीला राज्यात लोकमताचा बूस्टर डोस मिळाला. निश्चितच महायुतीला चिंतनाची वेळ आली होती. त्यामुळे विधानसभा निवडणूक लांबलेल्या (!) तारखा पाहता सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातही यात्रा आणि आंदोलनाने राजकीय स्पेस व्यापला आहे. अर्थातच शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगारी हा मुद्दा अग्रभागी आहे.
बुलडाणा लोकसभा निवडणुकीत काय झालं हे नव्याने सांगण्याची गरज नाही. विजय चौकार खेचत खासदार प्रतापराव जाधव हे जिल्ह्याच्या इतिहासात सलग चौथ्यांदा निवडून येण्याच्या नव्या विक्रमासह केंद्रात मंत्री देखील झाले. विधानसभेत मात्र सर्वच काही आलबेल आहे असं नाही. महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडी मध्येही जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कोण कुठली जागा "नक्की लढवणार "याची अजून "खात्री" कार्यकर्त्यांनाच काय नेत्यांना देखील नाही. जिल्ह्याच्या सात विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर घाटाखाली असलेल्या मलकापूर (आ.राजेश एकडे)या विधानसभा मतदारसंघाचा एकमेव अपवाद वगळता जळगाव जामोद( संजय कुटे) खामगाव (आकाश फुंडकर) तर घाटावर बुलडाणा (संजय गायकवाड), चिखली( श्वेता महाले), मेहकर( संजय रायमुलकर) आणि सिंदखेड राजा (राजेंद्र शिंगणे) या सहाही विधानसभा मतदारसंघात सध्या सत्ताधारी आमदार आहेत. मलकापूर ,जळगाव जामोद आणि खामगाव या तिन्ही जागा महायुती मध्ये भाजपकडेच राहतील. 
  घाटावर देखील चिखलीची जागा भाजपच लढेल. शिवसेना शिंदे गटात मेहकर मध्ये उमेदवार फिक्स आहे. बुलडाण्यात महिलांसाठी मतदारसंघ राखीव ठेवावा अशी मागणी येत असली तरीही राज्यभर आपल्या "बाईट्स"मुळे प्रसिद्ध असलेले संजय गायकवाड यांचे तिकीट कटने सध्या तरी शक्य दिसत नाही. सिदखेडराजात डॉ.शिंगणे हे महायुतीत लढतात की महाविकास कडून यामुळे सध्या तरी संभ्रम आहेत. महाविकास आघाडी कडून विचार केला तर मलकापूर मध्ये अर्थातच आमदार राजेश इकडे पुन्हा उमेदवार राहतील. घाटावर चिखलीत राहुल बोंद्रे पुन्हा एकदा मैदानात उतरतील. इतर पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र नेमके महाविकास आघाडीत कोण लढेल आणि कुणाला जागा सुटेल हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. 
हे सगळं सांगण्याचा प्रपंच यासाठीच की, निवडणुकांचा काळ पाहता यात्रा आणि आंदोलनांनी राजकीय स्पेस व्यापला आहे. 
   पिक विम्याच्या प्रश्नावर सत्ताधारी आमदार तोंडघशी पडलेले असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोरच अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मंत्रालयात बैठक लावण्याचा शब्द दिल्यावर कालच हे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
   चिखली मध्ये काँग्रेसचे राहुल जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी ही संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून गाव टू गाव संपर्क वाढवला आहे. जिल्हा मुख्यालयाच्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदाराची गाडी पोलीस धूत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून त्यानंतर सोशल वॉर छेडले आहे. आमदार गायकवाड समर्थकांनी मुंबईच्या फ्लॅटच्या संदर्भात केलेला अवास्तव दावा खोडून काढत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा गुगली टाकत गायकवाड यांना जेरीस आणले आहे. तो फ्लॅट आणि कागद द्या तुमच्या नावावर करतो नाहीतर त्या फार्म हाऊसची जागा संबंधित लाडक्या बहिणीला परत करा अशा आशयाच्या त्यांच्या व्हिडिओने खळबळ उडवली आहे. दुसरीकडे बुलडाणा विधानसभा मतदारसंघातच ठाकरे गट जिवंत ठेवणाऱ्या जालिंदर बुधवत यांनी आपल्या थेट काम करून दाखवण्याच्या शैलीप्रमाणे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आक्रोश मोर्चा ची घोषणा केली आहे . त्यासाठी मशाल जागर यात्रा च्या माध्यमातून ते देखील बुलडाणा विधानसभा मतदारसंघात गावागावात जात आहेत. या यात्रेला मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. 
   जयश्रीताई शेळके यांनी आपले मनसुबे आधी स्पष्ट केलेले आहेत त्या देखील जनमाणसांमध्ये संपर्क ठेवून आहेत. इतर इच्छुक नेते देखील आपापल्यापरीने खेडेपाडे फिरत आहेत.जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा विदर्भा आघाडीचे नेते प्रशांत डीक्कर यांनी देखील शिवजागर यात्रेच्या माध्यमातून संपर्क वाढवला आहे.
त्यामुळे आंदोलनाच्या आणि यात्रांच्या माध्यमातून सरकार विरोधात असलेला राजकीय स्पेस विरोधकांनी व्यापला आहे एवढं नक्की.!!