Sunday लक्षवेधी! : “अशी’ अडचण जी कुणाला सांगूही शकत नाही…; नगराध्यक्ष “महिला’ असलेल्या बुलडाण्यात किती दिवस हाेणार तिची ही कुचंबना?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ती खरेदीसाठी शहरात जायला घराबाहेर पडली की आधी “ती’ काळजी घ्यावी लागते. कारण शहरात कुठेही तिच्यासाठी लघुशंकेसाठी व्यवस्था नाही… पुढे चार-पाच तास तिला “रोखून’ धरावे लागते. यामुळे शहरातील अनेक महिलांना इन्फेक्शन, पोटात दुखणे, पिशवीची ताकद कमी होणे, किडनी स्टोनसारखे आजार जडले आहेत. सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेली नगरपालिका मात्र या …
 
Sunday लक्षवेधी! : “अशी’ अडचण जी कुणाला सांगूही शकत नाही…; नगराध्यक्ष “महिला’ असलेल्या बुलडाण्यात किती दिवस हाेणार तिची ही कुचंबना?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ती खरेदीसाठी शहरात जायला घराबाहेर पडली की आधी “ती’ काळजी घ्यावी लागते. कारण शहरात कुठेही तिच्‍यासाठी लघुशंकेसाठी व्यवस्‍था नाही… पुढे चार-पाच तास तिला “रोखून’ धरावे लागते. यामुळे शहरातील अनेक महिलांना इन्फेक्शन, पोटात दुखणे, पिशवीची ताकद कमी होणे, किडनी स्‍टोनसारखे आजार जडले आहेत. सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेली नगरपालिका मात्र या महत्त्वाच्‍या प्रश्नाच्‍या बाबतीत उदासिन असल्याचे चित्र आहे. विशेष म्‍हणजे शहराचा कारभारही एका महिलेच्‍याच हाती आहे. तरीही त्‍यांना महिलांची ही गंभीर समस्‍या लक्षात येऊ नये याबाबत महिलांनी आश्चर्य व्‍यक्‍त केले आहे. शहरात जागोजागी महिलांसाठी स्‍वतंत्र, स्वच्‍छ मुत्रिघरांची आवश्यकता असून, त्‍यादृष्टीने नगरपालिकेने तातडीने हालचाली करण्याची गरज आहे. मतांसाठी मायमाऊलींचे पाय धरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्‍यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

बुलडाणा शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांचे प्रमाणही मोठे आहे. त्‍यांची अवस्‍था काय होत असेल याची कल्पनाही करवणार नाही. जिल्ह्याचे मुख्यालय पण महिलांना स्‍वच्‍छ, स्‍वतंत्र मुत्रिघर नाही. त्‍यामुळे शहराचाही लौकिक काळवंडत आहे. पुरुषांसाठी मुत्रिघर आहेत, पण ते अत्‍यंत घाणेरडे आहेत, त्‍यांची नियमित स्‍वच्‍छता होत नाही. पुरुष मंडळी त्‍या ठिकाणी ॲडजस्‍ट करूनही घेतात, पण महिलांची समस्या कायम आहे. बुलडाणा नगरपरिषद प्रशासनाने बोटावर मोजण्याइतकी तीही पुरुषांसाठीच स्वच्‍छतागृहे उभारली आहेत. शहरातील आठवडी बाजार, जयस्तंभ चौक या ठिकाणी असलेली मुत्रिघरे अतिशय घाणेरडी आहेत. त्यामुळे पुरुषही मुत्रीघरात न जाता बाहेरच लघुशंका उरकून घेतात. मुत्रीघरात दारूच्या बाटल्या पडलेल्‍या असतात.

आठवडी बाजारात होते महिलांची अडचण
जिल्ह्याचे केंद्र असल्याने तालुक्यातील अनेक महिला खरेदीसाठी व अन्य कामासाठी शहरात येतात. प्रवासाचे एक ते दोन तास आणि बाजारात ३ ते ४ तास लागतात. या दरम्यान अनेक महिला लघवीचे कष्ट नको म्हणून पाणीच पीत नाहीत. पाणी पिण्याचे टाळणे आरोग्याला घातक आहे. त्यामुळे महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि ही अडचण त्‍या कुणाला सांगूही शकत नाहीत.

डॉक्‍टर म्‍हणतात…
अडीच ते तीन तासांत लघवीची पिशवी भरते. तीन तासांत एकदा लघवी केलीच पाहिजे असे डॉक्टर सांगतात. जास्तकाळ लघवी थांबवून ठेवल्याने इन्फेक्शन, पोटात दुखणे, पिशवीची ताकद कमी होणे. शिंक आणि खोकला आल्यास नकळत लघवी गळण्याचे प्रकारही होतात. दाब जास्त झाल्यास त्याचा किडनीवरही परिणाम होतो.

डॉ. माधवी जवरे, स्त्री रोग तज्‍ज्ञ बुलडाणा

नगरपालिका प्रशासनाकडून महिला स्वच्छतागृहाच्या बाबतीत नेहमीच दूर्लक्ष केले जाते. त्यामुळे घराबाहेर पडून काम करणाऱ्या महिलांची मोठी कुंचबना होते. अनेक आजारांचा सामना त्यामुळे महिलांना करावा लागतो. समाजातील मातृशक्तीला सोबत घेऊन आम्ही या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला जाब विचारू.

– विजयाताई राठी, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, बुलडाणा

महिलांसाठी स्वछतागृह हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सहसा चर्चाही न होणाऱ्या या विषयाला बुलडाणा लाइव्हने हात घातल्याबद्दल धन्यवाद. या विषयावर त्वरित नगरपरिषद प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. मी स्वतः या विषयासंदर्भात नगर परिषद प्रशासनासोबत चर्चा करेल.

– जयश्रीताई शेळके, जिल्‍हा परिषद सदस्य, बुलडाणा

महिला म्‍हणतात…
बाजारात आम्ही भाजीपाला विक्रीचे काम करतो. पण इथे लघवीला जागाच नाही. टाइम पाहून ॲडजस्ट करावं लागतं. जवळपाच्‍या परिसरातील महिलांशी ओळख झाल्याने त्‍यांच्‍या घरी आम्‍ही जातो. पण हेही योग्‍य वाटत नाही. नगरपरिषदेने महिलांची ही समस्या सोडविणे गरजेचे आहे.

– भाजीपाला विक्रेती महिला

आम्‍हाला खरेदीसाठी मार्केटमध्ये आल्यावर आधीच काळजी घ्यावी लागते. अन्यथा खरेदीतही लक्ष लागत नाही. घरी येईपर्यंत प्रचंड त्रास होतो. मते मागण्यासाठी येणाऱ्यांना महिलांची ही समस्या आजवर लक्षात कशी आली नाही हे कळत नाही. बुलडाणा लाइव्हने हा विषय पुढे रेटावा.

– तृप्‍ती काळे, शिवशंकरनगर, बुलडाणा

बुलडाणा शहरात महिला स्वच्‍छतागृह असायला पाहिजेत. करांसाठी आग्रह धरणाऱ्या नगरपरिषदेने महिलांची ही सुविधा सोडवणे गरजेचे आहे. महिला नगराध्यक्षा असल्याने हा प्रश्न सोडवला जाईल अशी अपेक्षा आहे.

– सौ. जयमाला कोठारे, धाड नाका, बुलडाणा