विहिरीवर पाणी काढताना अचानक बिबट्याचा हल्ला! पंज्याने पाठीचे मांस खरवडले; जीव वाचवण्यासाठी शेतमजुराची विहिरीत उडी
अंत्री खेडेकर येथील रहिवासी पंजाब दगडू मोरे (वय ५०) हे संजू शिवशंकर खेडेकर यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. दरम्यान, पिण्याचे पाणी आणण्यासाठी ते शेतातील विहिरीवर गेले होते. विहिरीतून पाणी काढत असतानाच अचानक पाठीमागून बिबट्या तेथे आला. काही कळायच्या आतच बिबट्याने पंजाब मोरे यांच्यावर झडप घेतली. यावेळी बिबट्याचा पंजा त्यांच्या पाठीला लागला. त्यामुळे त्यांच्या अंगावरील शर्ट फाटला असून, पाठीचे मांस पंज्याने खरचटल्याने ते जखमी झाले.
अचानक समोर आलेल्या बिबट्याला पाहून पंजाब मोरे यांनी घाबरून न जाता प्रसंगावधान राखले आणि स्वतःचा जीव वाचविण्यासाठी थेट विहिरीत उडी घेतली. त्यामुळे बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुखरूप सुटका झाली.
दरम्यान, याच परिसरात बिबट्याने रामहरी खेडेकर यांच्या शेतातील गायीचे वासरू ठार केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकरी राजू खेडेकर व समाधान मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पंजाब मोरे यांना उपचारासाठी अंत्री खेडेकर येथील दवाखान्यात दाखल केले.
बिबट्याचा परिसरातील वाढता वावर पाहता शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतात काम करताना बिबट्याच्या हल्ल्याची भीती निर्माण झाल्याने वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच परिसरात गस्त वाढवून शेतकरी व ग्रामस्थांना सुरक्षितता द्यावी, अशी मागणी होत आहे.