एमपीएससीविरोधात बुलढाण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश! विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी..
पुण्यात मागील काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांच्या कथित गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला रोहित पवार यांनी पुढाकार घेतल्याने त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील विद्यार्थ्यांनीही आंदोलनाची भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘आमचा बाप बांधावर, अन् आम्ही रस्त्यावर’ अशी भूमिका मांडत परीक्षांमधील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा संताप व्यक्त केला. ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, परीक्षांमध्ये गैरप्रकार होत असतील तर त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, पुण्यात सुरू असलेल्या रोहित पवार यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची तयारीदेखील बुलढाण्यातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.