जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील -! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन! मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन...

 
 बुलढाणा (जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येत असून, मॉडेल डिग्री कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयामुळे जिल्ह्याचा कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

बुलढाणा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित बिरसिंगपूर येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संजय गायकवाड, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नागरे, मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ. ए. आर. म्हळसने, कार्यकारी अभियंता जे. एन. काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच बिरसिंगपूरच्या सरपंच वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. प्रतापराव जाधव म्हणाले की, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज या महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात होत आहे. या महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. सुसज्ज इमारत, स्विमिंग पूल, क्रीडांगण यांसारख्या आधुनिक सुविधा येथे उभारण्यात येणार असून, त्यातून गुणवंत विद्यार्थ्यांची नवीन पिढी घडेल आणि जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, यापूर्वी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत होते. मात्र आता मॉडेल डिग्री कॉलेजमुळे जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम दर्जेदार आणि टिकाऊ व्हावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले, तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले.